Carl Weathers Passes Away: मनोरंजन विश्वातून पुन्हा एक दुःखद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अमेरिकन अभिनेते कार्ल वेदर्स यांचे निधन झाले आहे. अभिनेते कार्ल वेदर्स हे ७६ वर्षांचे होते. शुक्रवारी, २ फेब्रुवारी रोजी कार्ल वेदर्स यांनी या जगाचा निरोप घेतला. 'रॉकी' फ्रँचायझीमध्ये बॉक्सर अपोलो क्रीडची भूमिका साकारणाऱ्या कार्ल वेदर्स यांच्या निधनाने चाहत्यांना धक्का बसला आहे. अभिनेते कार्ल वेदर्स यांच्या निधनामुळे हॉलिवूड इंडस्ट्रीचेही मोठे नुकसान झाले आहे. आता सगळेच चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत.
आपल्या अभिनयाने नेहमीच लोकांच्या हृदयाला स्पर्श करणाऱ्या कार्ल वेदर्स यांनी सगळ्यांच्याचा मनावर राज्य केले होते. कार्ल वेदर्स यांच्या कुटुंबाने त्यांच्या मृत्यूच्या बातमीची पुष्टी केली आहे. अभिनेत्याच्या निधानाविषयी माहिती देताना कार्ल वेदर्स यांच्या कुटुंबीयांनी सांगितले की, ‘१९८७ साली आलेल्या 'प्रिडेटर' चित्रपटात अर्नोल्ड श्वार्झनेगरसोबत झळकलेले कार्ल वेदर्स आता आपल्यात नाहीत.’ चित्रपटांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे कार्ल वेदर्स काहीच दिवसांपूर्वी छोट्या पडद्यावर देखील दिसले.
मीडिया रिपोर्टनुसार, कार्ल वेदर्स यांच्या कुटुंबीयांनी याबद्दल माहिती देताना सांगितले की, ‘ही बातमी सांगताना आम्हाला खूप दुःख होत आहे. कार्ल वेदर्स हे एक अतिशय साधे व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी नेहमी आपल्या कामाकडे जास्त लक्ष दिले होते. टीव्ही, चित्रपट, क्रीडा आणि कलेतील त्यांच्या देदीप्यमान योगदानासाठी कार्ल नेहमीच लक्षात राहतील.’
अभिनेते कार्ल वेदर्स यांच्या कुटुंबाने त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट केलेले नाही. मात्र, कार्ल वेदर्स यांचा झोपेतच मृत्यू झाला, असे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले आहे. कार्ल वेदर्स यांच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे, तर मोठा पडदा असो, वा छोटा पडदा त्यांनी नेहमीच उत्कृष्ट काम केले आहे. त्यांनी चित्रपट आणि टीव्ही विश्वात ७५हून अधिक शो केले होते. त्यांनी १९७०मध्ये आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. आता कार्ल वेदर्स आपल्यासोबत या जगात नाहीत. त्यांच्या निधनामुळे जगभरातील चाहत्यांना आणि मनोरंजन विश्वाला मोठा धक्का बसला आहे.
संबंधित बातम्या