मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  बॉलिवूडच्या ‘या’ क्लासिक गाण्यांशिवाय अधुराच आहे होळीचा सण! तुम्ही बनवलीत का स्पेशल प्लेलिस्ट?

बॉलिवूडच्या ‘या’ क्लासिक गाण्यांशिवाय अधुराच आहे होळीचा सण! तुम्ही बनवलीत का स्पेशल प्लेलिस्ट?

Mar 23, 2024 10:46 AM IST

बॉलिवूडच्या क्लासिक गाण्यांशिवाय होळीचा सण अपूर्ण वाटतो. आज आम्ही तुमच्यासाठी अशाच काही गाण्यांची यादी आणली आहे, जी तुमच्या होळीच्या आनंदात आणखी भर घालेल.

बॉलिवूडच्या ‘या’ क्लासिक गाण्यांशिवाय अधुराच आहे होळीचा सण!
बॉलिवूडच्या ‘या’ क्लासिक गाण्यांशिवाय अधुराच आहे होळीचा सण!

सगळीकडेच आता होळीच्या सणाची तयारी सुरू झाली आहे. दरवर्षी लोक या रंगांच्या सणाची आतुरतेने वाट पाहत असतात. होळी आणि बॉलिवूडचे नाते खूप जुने आहे. असे अनेक चित्रपट आले आहेत, ज्यात होळी मोठ्या थाटामाटात साजरी करताना दाखवण्यात आले आहे. बॉलिवूडच्या क्लासिक गाण्यांशिवाय हा सण अपूर्ण वाटतो. आज आम्ही तुमच्यासाठी अशाच काही गाण्यांची यादी आणली आहे, जी तुमच्या होळीच्या आनंदात आणखी भर घालेल. ही गाणी खूप जुनी असली, तरी आजही या गाण्यांशिवाय होळीचा सण अपूर्ण वाटतो.

रंग बरसे भीगे चुनरवाली

१९८१मध्ये रिलीज झालेल्या ‘सिलसिला’ चित्रपटातील ‘रंग बरसे भीगे चुनरवाली’ हे गाणे आजही खूप लोकप्रिय आहे. हा चित्रपट त्या काळातील सर्वात हिट चित्रपटांपैकी एक होता. या चित्रपटात अमिताभ बच्चन, जया बच्चन, रेखा आणि राजीव कुमार महत्त्वाच्या भूमिकेत दिसले आहेत. चित्रपटातील ‘रंग बरसे भीगे चुनरवाली’ हे गाणे ऐकल्याशिवाय होळीचा सण पूर्ण होऊच शकत नाही.

ट्रेंडिंग न्यूज

होली के दिन दिल खिल जाते हैं

‘होली के दिन दिल खिल जाते हैं’ हे गाणे आजही खूप लोकप्रिय आहे. ‘शोले’ चित्रपटातील हे गाणे खूप गाजले होते. हा चित्रपट १९७५मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अमिताभ बच्चन, धर्मेंद्र आणि हेमा मालिनी महत्त्वाच्या भूमिकेत दिसले होते. हे गाणे होळीच्या दिवशी सगळीकडे आवर्जून वाजवलेच जाते.

आज न छोड़ेंगे बस हमजोली

आशा पारेख आणि राजेश खन्ना यांच्या ‘कटी पतंग’ या चित्रपटातील ‘आज न छोड़ेंगे बस हमजोली, खेलेंगे हम होली’ हे गाणे आजही होळीच्या उत्सवात वाजवले जाते. होळीच्या प्लेलिस्टमध्ये हे अप्रतिम गाणे अजिबात मिस करू नका.

अंग से अंग लगाना

शाहरुख खानच्या ‘डर’ या चित्रपटातील ‘अंग से अंग लगाना, सजन हमे ऐसे रंग लगाना’ हे गाणे देखील खूप लोकप्रिय गाणे आहे. होळीच्या गाण्यांमध्ये हे गाणे सर्वांच्याच मनावर कायम राज्य करते. यश चोप्रांच्या ‘डर’ या चित्रपटात होळीचा सण दाखवण्यात आला आहे. १९९३ मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटांपैकी हा चित्रपट सुपरहिट ठरला आहे.

होली खेले रघुवीरा

‘होली खेले रघुवीरा’ या गाण्याशिवाय होळीचा सण आणि जल्लोष पूर्ण होऊच शकत नाही. हे गाणे होळीच्या खास प्रसंगासाठीच बनवण्यात आले आहे. गाण्यात गुलाल उधळून लोक होळीचा सण आनंदाने साजरा करताना दिसले आहेत. हे गाणे अमिताभ बच्चन आणि हेमा मालिनी यांच्यावर चित्रित करण्यात आले आहे.

बलम पिचकारी

२०१३ मध्ये रिलीज झालेला रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोण स्टारर 'ये जवानी है दिवानी' हा सिनेमा सुपरहिट ठरला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली होती. चित्रपटातील ‘बलम पिचकारी’ हे गाणे होळीचा जल्लोष आणि आनंद द्विगुणीत करणारं आहे.

WhatsApp channel