Hina Khan Viral Video: प्रसिद्ध अभिनेत्री हिना खानने काही दिवसांपूर्वी आपल्याला ब्रेस्ट कॅन्सर झाल्याची बातमी शेअर करत सर्वांनाच मोठा धक्का दिला आहे. हिना सध्या उपचार घेत असून, यादरम्यान ती चाहत्यांना सकारात्मक संदेश देताना दिसत आहे. आता हिनाने तिच्या पहिल्या केमोचा व्हिडीओ शेअर केला आहे. तिचा हा व्हिडीओ तिच्या चाहत्यांना भावूक करेलच,पण हिना मनाने किती मजबूत आहे आणि ती या आजाराशी कशा प्रकारे सकारात्मकपणे लढत आहे, याचा ही पुरावा देईल.
काही दिवसांपूर्वी हिना एका कार्यक्रमात दिसली होती. त्यावेळी तिला कॅन्सर झाला आहे, हे कुणालाच माहित नव्हते आणि या दरम्यान ती केमोसाठीही जायची. हिनाने शेअर केलेल्या व्हिडीओची सुरुवात एका इव्हेंटपासून होते, ज्यात हिना खान पापाराझींसमोर पोज देताना दिसत आहे. यानंतर अभिनेत्रीला एक पुरस्कार मिळतो. पुरस्कार मिळाल्यानंतर हिना लगोलग पुन्हा हॉस्पिटलला रवाना होते. त्यानंतर ती रुग्णालयात जाते आणि म्हणते की, ‘आता सर्व ग्लॅमर निघून गेले आहे आणि मी माझ्या पहिल्या केमोसाठी आले आहे.’
व्हिडीओ शेअर करत हिनाने लिहिले की, 'या अवॉर्ड नाईटमध्ये मला माहित होते की मला कॅन्सर झाला आहे,परंतु मी फक्त माझ्यासाठीच नाही, सगळ्यांसाठी ही परिस्थिती नॉर्मल ठेवण्याचा निर्णय घेतला. या दिवसाने सर्व काही बदलून टाकले आहे. माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण टप्प्याची ही सुरुवात होती. आपण जे विचार करतो,ज्यावर विश्वास ठेवतो तेच आपण बनतो,म्हणून मी याला एक आव्हान म्हणून स्वीकारले.’
हिनाने पुढे लिहिले की,'मला माझा हा अनुभव नॉर्मल ठेवायचा होता. माझ्या कामाची बांधिलकी माझ्यासाठी महत्त्वाची आहे. माझ्यासाठी प्रेरणा,आवड आणि कला महत्त्वाची आहे. मी या आजारासमोर हात टेकण्यास नकार दिला. माझ्या पहिल्या केमोआधी मिळालेला हा पुरस्कार माझ्यासाठी प्रेरणादायी होता. यानंतर तर मी स्वतःला सांगू शकेन की, मी ठरवलेले बेंचमार्क आता मी जगत आहे. म्हणून मी या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. मी सर्वांना सांगू इच्छिते की,आपल्या आयुष्यातील आव्हाने स्वतःसाठी सामान्य करा आणि नंतर ती जगा. कितीही अवघड असलं तरी मागे हटू नका आणि कधीही हार मानू नका.’
अभिनेत्रीच्या या व्हिडीओवर चाहत्यांपासून सेलेब्सपर्यंत सर्वांनी कमेंट्स करत हिनाला भरभरून पाठिंबा देत तिच्यावर प्रेमाचा वर्षाव केला आहे. हिनाचा बॉयफ्रेंड रॉकी जयस्वालनेही यावर कमेंट करत'माय फायटर' असे म्हटले आहे.
संबंधित बातम्या