Hina Khan Breast Cancer News : लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री हिना खानने गेल्या वर्षी सोशल मीडियावर आपल्याला कॅन्सर झाल्याचा खुलासा करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. मात्र, उपचारादरम्यान हिना खूप पॉझिटिव्ह राहिली आणि तिने सोशल मीडियावर चाहत्यांना नेहमीच प्रेरित केले. तिला वेदना होत असतील किंवा टी छोटीशी सुट्टी एन्जॉय करत असेल, तरी ती चाहत्यांसोबत आपले सर्व अपडेट्स शेअर करत असते. आता हिनाने सांगितले की, तिला कॅन्सरची बातमी मिळाली, तेव्हा पहिली प्रतिक्रिया काय होती.
अभिनेत्री हिना खान नुकतीच ‘इंडियाज बेस्ट डान्सर व्हर्सेस सुपर डान्सर’मध्ये दिसली. या शोचा एक नवीन प्रोमो समोर आला आहे, ज्यामध्ये गीता कपूर हिना म्हणते की, ‘तुझा प्रवास खूप प्रेरणादायी आहे. पण एक क्षण असा ही आला असावा की, आपण या आजाराला सामोरे जाणार हे कळल्यावर मनातून हदारायला झाले असेल.’
यावेळी अभिनेत्री हिना खान म्हणाली की, ‘त्या दिवशी माझा बॉयफ्रेंड रॉकी जयस्वाल माझ्या घरी आला होता. आम्ही सगळे जेवण करून बसलो होतो आणि त्याने मला ब्रेस्ट कॅन्सरबद्दल सांगितलं. डॉक्टरांनी मला फोन केला नाही. माझ्या जोडीदाराने सांगितले की, रिपोर्ट पॉझिटिव्ह आहे आणि ब्रेस्ट कॅन्सर आहे. मला आठवतंय तो घरी येण्याच्या १० मिनिटे आधी मी माझ्या भावाला सांगितलं होतं की, मला काहीतरी गोड खायचे आहे. त्यावेळी आम्ही फलूदा मागवला होता.’
हिना खान पुढे म्हणाली की, ‘घरात गोड आलं की, काहीतरी चांगलं होईल असं मला वाटलं होतं. पण त्यावेळी हातात गोड तर, कानात कडू बातमी होती. त्यामुळे हा बदल मी सकारात्मकरित्या स्वीकारण्याचा निर्णय घेतला.’ हे सांगितल्यानंतर हिनाने ‘लग जा गले’ हे गाणे गायले. '
यावेळी हिना म्हणाली की, या शोमध्ये येण्यापूर्वी ती रेडिएशन सेशन संपवून आली आहे. तर, तिला बघून हर्ष म्हणतो की, प्रत्येकजण तिचा खूप आदर करतो आणि तिचा हा प्रवास खूप प्रेरणादायी आहे. यावेळी हिना खान खूप भावूक होते, पण ती म्हणते की, ‘मला रडायचे नाही, मी खूप खंबीर आहे.’ एकीकडे कॅन्सरशी लढा देत असतानाच दुसरीकडे हिना खान आपल्या कामावर देखील लक्ष केंद्रित करत आहे.