Hina Khan Breast Cancer: टीव्ही अभिनेत्री हिना खानला स्टेज ३ ब्रेस्ट कॅन्सरचं निदान झालं आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तिने आपल्या प्रियजनांना ही बातमी दिली आहे. हिनाने एक पोस्ट लिहित त्यात म्हटले आहे की, तिच्या या आजारावर उपचार सुरू झाले आहेत आणि ती यातून लवकर बरी व्हावी म्हणून शक्य ते सगळे प्रयत्न केले जात आहेत. दरम्यान, तिने चाहत्यांकडून त्यांचा पाठिंबा आणि शुभेच्छा मागितल्या आहेत. हिना खान लवकर बरी व्हावी, यासाठी आता इंडस्ट्रीतील लोकांनी देखील तिच्या पोस्टवर कमेंट करून तिच्यासाठी प्रार्थना करत असल्याचे म्हटले आहे.
३६ वर्षीय अभिनेत्री हिना खान हिला ब्रेस्ट कॅन्सरचं निदान झालं आहे. तिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर नुकतीच एक पोस्ट लिहिली आहे की, ‘गेल्या काही काळापासून पसरलेल्या काही अफवांनंतर, मी स्वतः ही महत्वाची बातमी माझ्यावर प्रेम करणाऱ्या आणि माझी काळजी वाटणाऱ्या प्रत्येकासोबत शेअर करू इच्छिते. मला स्टेज ३ ब्रेस्ट कॅन्सरचे निदान झाले आहे. हा एक आव्हानात्मक आजार असला तरी, तुम्हा सगळ्यांना सांगते की मी यातून नक्की बरी होईन. या आजाराचा सामना करण्यासाठी मी खंबीर, दृढ निश्चयी आहे. माझ्यावर उपचार सुरू झाले आहेत आणि या आजारावर मात करण्यासाठी मी सर्व काही करण्यास तयार आहे.’
हिनाने तिच्या पोस्टमध्ये पुढे लिहिले की, ‘यावेळी मला तुमच्याकडून प्रायव्हसीची अपेक्षा आहे. मी नेहमीच तुमचे प्रेम, पाठिंबा आणि आशीर्वाद मागितले आहेत. या प्रवासात तुमचे वैयक्तिक अनुभव, किस्से आणि सपोर्टिंग सल्ले माझ्यासाठी खूप मोलाचे ठरतील.’
या पुढे हिनाने लिहिले की, ‘मी माझ्या प्रियजन आणि कुटुंबासह नेहमीच दृढ निश्चयी आणि सकारात्मक राहीन. देवाच्या कृपेने मी या आजारावर लवकरच मात करेन आणि पूर्णपणे निरोगी होईन, याची आम्हा सर्वांनाच खात्री आहे. प्रार्थना, आशीर्वाद आणि प्रेम पाठवत राहा.’ हिना खान गेल्या काही दिवसांपासून सतत काही मेसेज पोस्ट करत होती. हिनाला कॅन्सर झाल्याचा कयास अनेकांनी बांधला होता. आता खुद्द हिनाने सगळ्यांना याबाबत अधिकृतपणे माहिती दिली आहे.
हिनाच्या पोस्टवर टीव्ही इंडस्ट्रीतील अनेक अभिनेत्रींच्या कमेंट्स पाहायला मिळत आहेत. अंकिता लोखंडेने लिहिले की, ‘हिना तू नेहमीच यापेक्षा मजबूत उभी आहेस. हेही आव्हान पार पडेल. तुला मनापासून खूप प्रेम आणि शुभेच्छा!’. रश्मी देसाईने लिहिले की, ‘तू नेहमीच खूप मजबूत होतीस, आता तुझ्यासाठी प्रार्थना करेन.’ आश्का गोराडिया, गौहर खान, श्रद्धा आर्या यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी हिना खान लवकर बरी होण्यासाठी प्रार्थना केली आहे.
संबंधित बातम्या