बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक हिमेश रेशमियाचे वडील विपिन रेशमिया यांचे निधन झाले आहे. संगीत दिग्दर्शक आणि निर्माते विपिन रेशमिया यांनी १८ सप्टेंबर, बुधवारी रात्री ८.३० वाजता अखेरचा श्वास घेतला. ते ८७ वर्षांचे होते. श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे त्यांना कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. काल दुपारी वृद्धापकाळामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे. या बातमीने बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये शोक पसरला आहे. अनेकजण सोशल मीडियाच्या माध्यमातून विपिन यांना श्रद्धांजली वाहत आहेत.
हिमेश रेशमियाच्या वडिलांवर गुरुवारी १९ सप्टेंबर रोजी जुहू येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. फॅशन डिझायनर वनिता थापर यांनी टाइम्स ऑफ इंडियाला याबाबत माहिती दिली आहे. गुरुवारी सकाळी विपिन रेशमियाचा मृतदेह आधी घरी आणला जाणार आहे आणि त्यानंतर त्यांचे अत्यंदर्शन होणार आहे अशी माहिती वनिता यांनी दिली आहे.
विपिन हे हिमेशचे वडीलच नव्हते तर त्यांचे गुरूही होते, 'असे खुद्द हिमेश रेशमियाने मुलाखतीत सांगितले होते. हिमेश रेशमिया म्हणाला होता की, 'माझे वडील, माझा देव माझे गुरू आहेत. माझ्या वडिलांनी मला जे शिकवले त्याचे प्रतिबिंब माझे संगीत आहे.' आता वडिलांच्या निधनानंतर हिमेश रेशमिला मोठा धक्का बसला आहे.
वाचा: प्रेक्षकांसाठी खुशखबर! ९९ रुपयांमध्ये पाहा मल्टीप्लेक्समध्ये सिनेमा, वाचा कधी आणि कुठे?
विपिन रेशमिया यांनी 'द एक्सपोज' (२०१४) आणि 'तेरा सुरूर' (२०१६) या चित्रपटांची निर्मिती केली होती. या दोन्ही चित्रपटांमध्ये त्यांचा मुलगा हिमेश रेशमियाने मुख्य भूमिका साकारली होती. याशिवाय विपिन यांनी 'इन्साफ का सूरज' (१९९०) या चित्रपटासाठीही संगीत दिले होते, पण काही कारणास्तव हा चित्रपट प्रदर्शित होऊ शकला नाही.