मुलगी झाली हो या मालिकेतून घराघरात पोहोचलेले अभिनेते म्हणजे किरण माने. या मालिकेतील त्यांची भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरली होती. त्यानंतर ते बिग बॉस मराठीच्या घरात दिसले. काही दिवसांपूर्वी किरण माने यांनी उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला. पण त्यांनी अभिनय सोडून राजकारणात प्रवेश का केला? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. नुकताच दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी यामागचे देखील कारण सांगितले आहे.
किरण माने यांनी नुकताच 'अजब गजब' या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांना राजकारणात प्रवेश करण्यासाठी ही योग्य वेळ का वाटली आणि पक्षप्रवेशासाठी सत्ताधाऱ्यांची निवड न करता उद्धव ठाकरेंना पाठिंबा का दिला? असा प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देत किरण माने यांनी केलेले वक्तव्य सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
वाचा: आसमानी मोहब्बत! कसा आहे दीपिका आणि हृतिकचा 'फायटर?', वाचा रिव्ह्यू
“सध्या अतिशय गलिच्छ राजकारण सुरू आहे. आपण सोशल मीडियावर एखादी पोस्ट करतो आणि आपले हजारो मित्र तू असं सरकारविरोधी बोलू नकोस असे सांगायला येतात. खरे सांगायचे झाले, तर सत्ताधाऱ्यांना धारेवर धरणे हे आपले काम आहे. प्रत्येक नागरिकाचे हे कर्तव्य देखील आहे. पण, आता सत्ताधाऱ्यांना कोणीच काही बोलायचे नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कोणतेच सत्ताधारी परफेक्ट नसतात आपण त्यांना त्या दिशेने घेऊन जायचे असते. जनता एखाद्या गोष्टीवर नाखूश असेल, तर सत्ताधाऱ्यांवर दबाव आला पाहिजे. पण, आता हे होतच नाहीये” असे किरण माने म्हणाले.
पुढे ते म्हणाले, “उद्धव ठाकरेंच्या पक्षाकडे जाणं मला जास्त सोयीस्कर वाटलं कारण, ठाकरे परिवार…त्यांच्या घरात कलाकारांना खूप सन्मान आहे. घरात राजकारणासह कलेचा वारसा आहे. त्यामुळे मला आणि एका कलाकाराच्या भावनेला ते समजून घेऊ शकतील याची मला खात्री होती. उद्धव ठाकरे खरंच खूप शांत आणि संयमी स्वभावाचे आहेत. राजकारणात सध्या जी चिखलफेक सुरू आहे त्यात सगळ्यात जास्त संयमी उद्धव ठाकरे आहेत. ज्यावेळी सगळे साथीदार सोडून गेले तेव्हा त्यांनी लगेच वर्षा बंगला सोडला. याला खूप मोठं धाडस लागतं. माणसं सत्ता सोडताना खूप आकांडतांडव करतात. पण, त्यांनी लगेच सोडली…ती गोष्ट मला खूप आवडली होती. त्यामुळेच मी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेबरोबर जाण्याचा निर्णय घेतला.”