गेल्या आठवड्यात चंदीगड आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीआयएसएफच्या कॉन्स्टेबलने कंगना रनौतला थप्पड मारल्याच्या घटनेचा अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी निषेध केला आहे. या यादीमध्ये आता चित्रपट निर्माता करण जोहर याच्या नावाचाही समावेश झाला आहे. कंगनाच्या ‘थप्पडकांड’वर आता करण जोहरने त्याची प्रतिक्रिया देत आपलं मत स्पष्टपणे व्यक्त केले आहे.
बुधवारी संध्याकाळी मुंबईत झालेल्या त्याच्या को-प्रॉडक्शन ‘किल’ चित्रपटाच्या ट्रेलर लाँचवेळी करणला मीडियाच्या एका सदस्याने विचारलं की, ‘कंगनाला सीआयएसएफ कॉन्स्टेबलने थप्पड मारल्याबद्दलच्या प्रकरणावर तुमची काय प्रतिक्रिया आहे? यावर करणने क्षणभरही न घेता उत्तर दिले की, ’हे बघा मी शाब्दिक किंवा शारीरिक कोणत्याही प्रकारच्या हिंसेचे समर्थन किंवा उत्तेजन देत नाही'. आपल्या या संक्षिप्त विधानाचा शेवट त्याने खळखळून हसत केला.
हिमाचल प्रदेशातील मंडी येथे भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर कंगना राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बैठकीसाठी दिल्लीला जात होती. चंदीगड आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षा व्यवस्था ओलांडत असताना कुलविंदर कौर नावाच्या सीआयएसएफ कॉन्स्टेबलने तिच्या चेहऱ्यावर चापट मारली. याचे कारण तिने अलीकडेच खलिस्तानवर केलेले वक्तव्य असल्याचा दावा कंगनाने केला आहे. त्यामुळे कुलविंदर विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला.
या घटनेनंतर अनेकांनी कंगनाला थप्पड मारल्याचा आनंद साजरा केला, तर पत्रकार फाये डिसूझा यांनी फेसबुक पोस्ट लिहून हिंसाचाराचा निषेध केला. विशेषत: विमानतळाच्या सुरक्षेचा विचार केला तर, ही घटना अतिशय निंदनीय असल्याचे म्हटले गेले आहे. कंगनासोबत दीर्घकाळ वाद सुरू असलेल्या अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी ही पोस्ट लाईक केली आहे, ज्यात तिचा कथित एक्स हृतिक रोशन, आलिया भट्ट, झोया अख्तर आणि सोनी राजदान यांचा समावेश आहे. ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांनीही एक्सवर लिहिलं आहे की, ‘कंगनावर माझं प्रेम नाही, पण तिच्यावर झालेल्या हिंसाचाराचा मी निषेध करेन.’
करण जोहरचे कंगनासोबत जोरदार भांडण झाले आहे. २०१७ मध्ये ‘कॉफी विथ करण’ या चॅट शोमध्ये तिने त्याला 'नेपोटिझमचा ध्वजवाहक' म्हटले होते. कंगना तिचा पहिला सोलो दिग्दर्शित ‘इमर्जन्सी’ चित्रपट प्रदर्शित करण्याच्या तयारीत आहे. तर, करणची निर्मिती असलेला क्राईम थ्रिलर ‘किल’ हा चित्रपट ४ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.