प्रत्येकाच्या आयुष्यात एखादी तरी हायली कॉन्फिडेन्शियल गोष्ट असतेच, हीच गोष्ट दुसऱ्या कोणाच्या हाती लागली तर काय जबरदस्त धिंगाणा होऊ शकतो याची कल्पनाच करता येत नाही. याच भन्नाट विषयावर आधारित एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'फकाट' असे हटके नाव असलेल्या या चित्रपटात हेमंत ढोमे महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. आता या चित्रपटातील एक गाणे प्रदर्शित झाले असून सोशल मीडियावर चर्चेत आहे.
प्रेमगीत, आयटम सॉंगनंतर आता श्रेयश जाधव दिग्दर्शित 'फकाट' चित्रपटातील एक भन्नाट, उडत्या चालीचे गाणे प्रदर्शित झाले आहे. 'जिंदगी आता झाली हल्ला गुल्ला' असे बोल असलेल्या या गाण्याला कौतुक शिरोडकर, हर्षवर्धन वावरे, करण वावरे आणि आदित्य पाटेकर यांचे बोल लाभले असून हर्षवर्धन वावरे, करण वावरे आणि आदित्य पाटेकर (ट्रिनिटी ब्रदर्स) यांचे जबरदस्त संगीत लाभलेले हे गाणे गायलेही त्यांनीच आहे. हे गाणे हेमंत ढोमे, सुयोग गोऱ्हे आणि रसिका सुनील यांच्यावर चित्रित करण्यात आले आहे. हा चित्रपट येत्या १९ मे रोजी प्रदर्शित होणार आहे.
वाचा: स्वत: चैनीत राहाचं आणि मुलीला मन मारायला सांगायचं; ईशाच्या लग्नावरुन अनिरुद्ध संतापला
हे गाणे ऐकायला जितके स्फूर्तिदायी आहे तितकेच ते पाहायलाही कमाल आणि कलरफुल आहे. या गाण्यात हेमंत आणि सुयोगकडे भरपूर पैसा आल्याचे दिसत असून ते भौतिक सुख अनुभवत असल्याचे या गाण्यात दिसतेय. या गाण्यात रॅपही अनुभवायला मिळत आहे. जे दिग्दर्शक श्रेयश जाधव यांनी केले आहे.
हेमंत ढोमे, सुयोग गोऱ्हे, अविनाश नारकर, रसिका सुनील, अनुजा साठे, नितीश चव्हाण, किरण गायकवाड, महेश जाधव आणि कबीर दुहान सिंग यांच्या प्रमुख भूमिका आहेत. वक्रतुंड एंटरटेनमेंट्स, गणराज स्टुडिओज प्रस्तुत या चित्रपटाच्या निर्मात्या नीता जाधव आहेत.
संबंधित बातम्या