प्रत्येकाच्या आयुष्यात एखादी तरी हायली कॉन्फिडेन्शियल गोष्ट असतेच, हीच गोष्ट दुसऱ्या कोणाच्या हाती लागली तर काय जबरदस्त धिंगाणा होऊ शकतो याची कल्पनाच करता येत नाही. याच भन्नाट विषयावर आधारित एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'फकाट' असे हटके नाव असलेल्या या चित्रपटात हेमंत ढोमे महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख समोर आली आहे.
'फकाट' या चित्रपटाचे दिग्दर्शक श्रेयश जाधव करत असून नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर करण्यात आले. येत्या १९ मे रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या पोस्टरमध्ये हेमंत ढोमे, सुयोग गोऱ्हे, अविनाश नारकर, कबीर दुहान सिंग, अनुजा साठे, रसिका सुनील, नितीश चव्हाण, किरण गायकवाड आणि महेश जाधव हे कलाकार दिसत आहेत. दमदार कलाकारांची फळी असलेला हा एक अॅक्शन कॉमेडी चित्रपट आहे.
वाचा: मिथुन चक्रवर्तीच्या मुलाचे बॉलिवूडमध्ये पदार्पण, आगामी सिनेमाचा ट्रेलर पाहिलात
पोस्टरमध्ये चित्रपटातील सगळे कलाकार दिसत असून एलओसी सिक्रेटची फाईल दिसत आहे आणि आजूबाजूला पैसेही दिसत आहेत. त्यामुळे आता हा नेमका काय प्रकार आहे? काय रहस्य आहे, याचे उत्तर चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच मिळेल. मात्र पोस्टर पाहाता चाहत्यांमध्ये उत्सुकता पाहायला मिळते.
दिग्दर्शक श्रेयश जाधव म्हणतात, "प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करणारा हा एक धमाल कौटुंबिक चित्रपट आहे. यात कॉमेडी आहे, अॅक्शन आहे. यात हायली कॉन्फिडेन्शियल धिंगाणा आहे. चित्रपटातील सगळेच कलाकार भन्नाट आहेत. प्रत्येकाने आपल्याला व्यक्तिरेखेला शंभर टक्के न्याय दिला आहे.''
संबंधित बातम्या