दिग्दर्शक हेमंत ढोमेचा ‘झिम्मा’ हा चित्रपट एक वर्षापूर्वी प्रदर्शित झाला होता. चित्रपटाचा हटके विषय, तगडी स्टारकास्ट या सर्वामुळे चित्रपटाने बॅाक्स ॲाफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला होता. रसिकांना हा चित्रपट आपल्या आयुष्याशी खूप साधर्म्य साधणारा वाटला त्यामुळेच जगभरातल्या प्रेक्षकांनी ‘झिम्मा’वर भरभरून प्रेम केले. आता 'झिम्मा २' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा नवा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा टीझर उत्सुकता वाढवणारा आहे.
'झिम्मा २' चित्रपटाच्या २ मिनिटे १३ सेकंदाच्या या टीझरमध्ये सिद्धार्थचा एक डायलॉग आहे, ''यावेळेला खूपच व्हरायटी आहे'' आणि हे अगदी खरंच आहे. कारण यावेळी या ताफ्यात आणखी दोन मैत्रिणी सहभागी झाल्या आहेत. त्यामुळे यावेळीही या इंद्रधनुष्याचे सात वेगवेगळे रंग बरसणार आहेत. मागच्यावेळेस नवीनच मैत्री झाली होती, हळूहळू ती बहरत गेली. आणि आता 'झिम्मा २' मध्ये ही मैत्री अधिकच परिपक्व झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे प्रेक्षकांसाठी मनोरंजनरूपी यंदाची ही सहल अधिकच अविस्मरणीय ठरू शकते!
वाचा: स्पर्धकांना झोपेच्या गोळ्या दिल्या जातात? वादग्रस्त ट्वीट व्हायरल
‘झिम्मा' मधील या सात मैत्रिणींना प्रेक्षकांनी आपलेसे केले आणि बॉक्स ऑफिसवर सुपरहिटची मोहर उमटवली. महिलांना त्यांच्या अंतरंगाचा शोध या निमित्ताने घेता आला. आयुष्यात स्वतःसाठी काही क्षण देणे, किती आवश्यक आहे, याची जाणीव 'झिम्मा'ने करून दिली. हेच 'स्वत्त्व' शोधायला लावणारा हा चित्रपट पुन्हा जोमाने आपल्या मैत्रिणींच्या भेटीला येत आहे. धमाल, मस्ती आणि मनोरंजनाचा फंडा नव्याने अनुभवायला आणि जगणं नव्याने एन्जॉय करायला शिकवणारा हा सिनेमा आहे.
'झिम्मा २' या चित्रपटात सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सायली संजीव आणि सिद्धार्थ चांदेकर, रिंकू राजगुरू आणि शिवानी सुर्वे या दोघी देखील या तगड्या स्टारकास्टमध्ये दाखल झाल्या आहेत. चित्रपटाच्या या टीझरमध्ये त्यांची पात्रदेखील भन्नाट वाटत आहेत.
संबंधित बातम्या