मराठी चित्रपटसृष्टीमध्ये सतत वेगवेगळ्या विषयांवर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसतात. त्यामध्ये दिग्दर्शक हेमंत ढोमेच्या चित्रपटांना प्रेक्षकांची चांगली पसंती असल्याचे पाहायला मिळाले. त्याच्या चित्रपटांची खासियत म्हणजे ते वास्तववादी असल्याने प्रेक्षक त्याच्याशी एकरूप होऊ शकतात. नुकतेच 'झिम्मा' या चित्रपटाचे दोन भाग प्रचंड गाजले. आता आपल्या गावच्या मातीतील चित्रपट घेऊन हेमंत ढोमे पुन्हा एकदा सज्ज झाला आहे. त्याचा 'फसक्लास दाभाडे!' हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे पोस्टर नुकताच प्रदर्शित झाले असून चर्चेत आहे.
हेमंत ढोमेने सोशल मीडियाच्या माध्यमातून 'फसक्लास दाभाडे' या आपल्या नवीन चित्रपटाची घोषणा केली असून येत्या १५ नोव्हेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे सांगितले. खुळ्या भावंडांची इरसाल स्टोरी यात पाहायला मिळणार आहे. एक आगळीवेगळी कथा असल्यामुळे चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता पाहायला मिळते.
हेमंत ढोमेने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर 'फसक्लास दाभाडे!' या आगामी चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. पोस्टरवर अमेय वाघ, क्षिती जोग आणि सिद्धार्थ चांदेकर ट्रॅक्टरवर बसलेले दिसत असून अमेय वाघने मुंडावळ्या बांधलेल्या आहेत. मागे घरही कुठल्यातरी मोठ्या समारंभासाठी सजलेले दिसत आहे. त्यामुळे या सोनू, पप्पू आणि तायडीची नेमकी काय कथा आहे आणि त्यात नेमके काय घडणार आहे, हे चित्रपट आल्यावरच कळेल.
'फसक्लास दाभाडे!' या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शनही हेमंत ढोमेने केले आहे. तर क्षिती जोग, सिद्धार्थ चांदेकर, अमेय वाघ यांच्या प्रमुख भूमिका आहेत. याच बरोबर या चित्रपटात अजूनही काही कलाकारांची फौज आहे असे कळले आहे. भूषण कुमार, आनंद एल. राय, क्षिती जोग आणि कृष्णा कुमार या चित्रपटाचे निर्माते आहेत.
वाचा: वन नाईट स्टँडपासून सुरू झाली 'या' कपलची लव्हस्टोरी, अभिनेत्रीने केले आहे शाहरुखसोबत काम
हेमंत ढोमेने चित्रपटाविषयी भावना व्यक्त केल्या आहेत. तो म्हणाला, "हा माझ्या अत्यंत जवळचा विषय आहे. मी जे जगलो, जे पाहिले ते सगळे मी यात मांडायचा प्रयत्न केला आहे. कोणीतरी असे म्हणाले आहे, सिनेमाचा विषय जेव्हा लेखकाच्या आणि दिग्दर्शकाच्या अत्यंत जवळचा असतो, तेव्हा तो प्रेक्षकांच्याही खूप जवळचा होतो. चित्रपट बनवताना ठरवले होते, हा चित्रपट आपल्या गावीच स्वतःच्या शेतात, स्वतःच्या मातीत चित्रीत करायचा आणि विशेष म्हणजे माझ्या लाडक्या टीमसोबत माझी ही इच्छा पूर्ण देखिल झाली. आता हा चित्रपट पूर्ण झाला असून १५ नोव्हेंबर रोजी तो तुमच्या भेटीला येणार आहे.''