Hemant Dhome Post : गेल्या काही दिवसांपासून अभिनेता राहुल सोलापूरकर यांचं नाव चर्चेत आलं आहे. नुकत्याच रेकॉर्ड केलेल्या एका पॉडकास्टमध्ये राहुल सोलापूरकर यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी काही वादग्रस्त गोष्टी बोलल्या होत्या. यामुळे आता वादाची ठिणगी उडाली आहे. केवळ प्रेक्षक आणि नेटकरीच नाही तर, आता मनोरंजन विश्वातून देखील यावर संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. अभिनेता-निर्माता हेमंत ढोमे याने देखील आता पोस्ट लिहून कडक शब्दांत समाचार घेतला आहे.
हेमंत ढोमे हे मराठी मनोरंजन विश्वातील मोठे नाव आहे. अभिनेता असण्याबरोबरच हेमंत ढोमे हा एक निर्माता देखील आहे. त्याच्या अनेक चित्रपटांना प्रेक्षकांकडून पसंती मिळाली आहे. अभिनेता सोशल मीडियावर देखील खूप सक्रिय असतो. इतकंच नाही तर तो आपली मते देखील बेधडकपणे मांडतो. दरम्यान त्याने आता एक पोस्ट लिहून अभिनेते राहुल सोलापूरकर यांच्यावर जोरदार टीका केली आहे. हेमंत ढोमे याने एक्सवर एम पोस्ट लिहिली आहे. यात त्याने म्हटले की, ‘इतिहासाला त्याच्या जागी राहूद्या आम्हाला आमच्या महाराजांच्या “रंजक” गोष्टींमधेच रमूद्या! रोज उठून नवा इतिहास सांगणारे स्वतःचे भविष्य अंधारात असणारे असतात! असल्या दुर्लक्षित आणि स्वतःकडे लक्ष वेधू पाहणाऱ्या स्वस्तातल्या इतिहासाचार्यांकडे सुज्ञांनी लक्ष न दिलेले बरे! उगाच सगळे सोलापूरकर बदनाम होतात!’
हेमंत ढोमे याच्या या पोस्टवर आता सगळेच कमेंट्स करून आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने लिहिलं की, 'शिवरायांना ३५० वर्षांपूर्वी पण कमी दाखवण्याचा प्रयत्न ज्यांनी केला, तेच लोक ३५० वर्षानंतर शिवरायांना कमी लेखण्याचा आणि त्यांचा इतिहास मोडण्याचा कार्यक्रम चालू केला आहे यांनी.ते लोक बिनधास्तपणे शिवरायांना कमी लेखण्याचा आणि यातून लोकांचें ब्रेन वॉश करण्याचा प्रयत्न करतात, चालू आहे.' आणखी एकाने लिहिले की, 'यांच्या अविचारी चाळ्यांकडे दुर्लक्ष केले, तर हे अधिकच चेकाळतील. या अशा वैचारिक विकृती वेळीच नाही ठेचल्या तर, हे इतिहासाचे अधिकच विकृती करण करत राहातील.'
अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी एका पॉडकास्टमध्ये वादग्रस्त वक्तव्य करत म्हटले की, ‘महाराज आग्र्याहून सुटले ते मिठाईचे पेटारे वगैरे काही नव्हते. महाराज चक्क लाच देऊन आले आहेत. त्यासाठी किती हुंड्या सोडवल्या याचे पुरावे आहेत. औरंगजेबाच्या वजीराला आणि त्याच्या बायकोलाही लाच दिली गेली होती. त्याचं मौसिन खान किंवा मोईन खान नाव आहे. त्याचे परवाने घेऊन सगळे बाहेर पडले होते. स्वामी परमानंद शेवटचे पाच हत्ती घेऊन गेले त्याच्या परवान्याची खूणही अजूनही आहे. गोष्टी रुपात करताना ते रंजक करुन सांगितलं गेलं आहे. त्यामुळे खरा इतिहास लोकांसमोर जात नाही.’
संबंधित बातम्या