Ashok Saraf: पुरस्कार तुम्हाला मिळालाय पण उर आमचा भरुन आलाय; अशोक मामांसाठी अभिनेत्रीची खास पोस्ट
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Ashok Saraf: पुरस्कार तुम्हाला मिळालाय पण उर आमचा भरुन आलाय; अशोक मामांसाठी अभिनेत्रीची खास पोस्ट

Ashok Saraf: पुरस्कार तुम्हाला मिळालाय पण उर आमचा भरुन आलाय; अशोक मामांसाठी अभिनेत्रीची खास पोस्ट

Aarti Vilas Borade HT Marathi
Jan 31, 2024 01:09 PM IST

Ashok Saraf Maharashtra Bhushan Purskar: अभिनेते अशोक सराफ यांना २०२३चा ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार’ जाहीर करण्यात आला. त्यानंतर सोशल मीडियावर पोस्ट करत अनेक कलाकारांनी आनंद व्यक्त केला आहे.

Hemangi Kavi Post for Ashok Saraf
Hemangi Kavi Post for Ashok Saraf

Hemangi Kavi Post: मराठी मनोरंजन विश्वातील दिग्गज अभिनेते अशोक सराफ यांना नुकताच २०२३चा ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार’ जाहीर करण्यात आला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अधिकृत अकाऊंटवरून याची घोषणा करण्यात आली. त्यानंतर मराठी चित्रपटसृष्टीमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. सर्वांचा आनंद गगनात मावेनासा झाला. आता मराठी चित्रपटसृष्टीमधील लोकप्रिय अभिनेत्री हेमांगी कवीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आनंद व्यक्त केला आहे. तिने 'पुरस्कार तुम्हाला मिळालाय पण उर आमचा भरुन आलाय' असे म्हटले आहे.

काय आहे हेमांगीची पोस्ट?

महाराष्ट्र भूषण! खूप खूप अभिनंदन भाई! पुरस्कार तुम्हांला मिळालाय पण उर आमचा भरून आलाय! एक अख्खी पिढी तुम्हांला बघत मोठी झालीए आणि अजून ही तुम्हांला पाहीलं की आमच्या काळातला ‘The Superstar’ म्हणून छाती फुगवून घेतोय! एवढ्या ताकदीचं काम करून ठेवलंय तुम्ही! आज तुम्हांला ‘महाराष्ट्र भूषण’ घोषित केलं, आम्हांलाच आनंद झालाय! महाराष्ट्र शासनाचे खूप खूप आभार! २००४ साली तुमच्या सोबत नाटकात काम करायचा बहुमान मला मिळाला होता.अनाधिकृतचे ते मंतरलेले ६ महिने मी कधीच विसरणार नाही!
वाचा: किंग खानसमोर थरथर कापायला लागला चाहता; मात्र शाहरुखच्या प्रेमानं जिंकलं सगळ्याचं मन!

हेमांगीने ही पोस्ट तिच्या फेसबुक अकाऊंटवर शेअर केली आहे. त्यासोबतच तिने काही अशोक मामांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिच्या या पोस्टवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.

अशोक मामांनी २५०हून अधिक चित्रपटांत केले काम

मराठी चित्रपटसृष्टीसोबतच अशोक सराफ यांनी बॉलिवूड चित्रपटसृष्टीतही खूप नाव कमावले आहे. यादरम्यान अशोक सराफ यांनी अनेक मराठी टीव्ही मालिका आणि चित्रपटांमध्ये आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे. अशोक सराफ यांचे नाव मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वोत्कृष्ट आणि दिग्गज अभिनेत्यांमध्ये घेतले जाते. त्यामुळेच अशोक सराफ यांना मराठी चित्रपटसृष्टीचे ‘अभिनय सम्राट’ म्हटले जाते. मराठी चित्रपटसृष्टीत बालकलाकार म्हणून आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या अशोक सराफ यांनी तब्बल २५० हून अधिक चित्रपट केले आहेत. अशोक सराफ यांनी आपल्या विनोदी भूमिकांच्या बळावर छोट्या पडद्यापासून मोठ्या पडद्यापर्यंत लोकांना खूप हसवले आहे.

अशोक सराफ ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’मध्ये करत होते काम

अशोक सराफ यांच्या ‘अशी ही बनवाबनवी’मधील ‘धनंजय माने’ आणि सलमान खान-शाहरुख खानचा चित्रपट ‘करण अर्जुन’मधील ‘मुन्शी’ या व्यक्तिरेखेने सर्वांची मने जिंकली. अभिनय कारकिर्दीपूर्वी अशोक सराफ ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’मध्ये काम करत होते. सुशिक्षित कुटुंबातील असल्यामुळे आपल्या मुलाने सरकारी नोकरी करावी, अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती. अशोक सराफ यांनी देखील वडिलांच्या इच्छेचा मान राखला आणि नोकरी देखील मिळवली. मात्र, त्यांना अभिनयाची ओढ शांत बसू देत नव्हती. त्यांनी नोकरीसोबतच अभिनयाला सुरुवात केली. हळूहळू ते पूर्णपणे अभिनय विश्वाकडे वळले आणि त्यांनी नोकरी सोडून दिली होती.

 

Whats_app_banner