Heeramandi First Look Out: दिग्दर्शक संजय लीला भन्साळी त्यांच्या आगामी 'हीरामंडी: द डायमंड बझार' या वेब सीरिजमुळे प्रचंड चर्चेत आहेत. या वेब सीरिजच्या माध्यमातून संजय लीला भन्साळी ओटीटी विश्वात पदार्पण करणार आहेत. 'हीरामंडी: द डायमंड बाजार' या वेब सीरिजची घोषणा २०२३मध्येच करण्यात आली होती. आता या बहुप्रतीक्षित वेब सीरिजचा फर्स्ट लूकही समोर आला आहे. सोशल मीडियावर सध्या या सीरिजचीच चर्चा सुरू आहे. ‘हीरामंडी’च्या या फर्स्ट लूकनेच सोशल मीडियावर कल्ला केला आहे.
'हीरामंडी: द डायमंड बझार' ही सीरिज यावर्षी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. या वेब सीरिजच्या पहिल्या फर्स्ट लूकमध्ये एक बाजार दाखवण्यात आला आहे. कधीकाळी वेश्याव्यवसाय करणाऱ्या स्त्रीया या भागाच्या राण्या होत्या. संजय लीला भन्साळींच्या या सीरिजमध्ये देखील भव्यता दिव्य सेट्स दाखवण्यात आले आहेत. या फर्स्ट लूक व्हिडीओमध्ये मनीषा कोईरालाची दमदार एन्ट्री आधी दाखवण्यात आली आहे. या वेब सीरिजमध्ये तिचा अतिशय इंटेन्स लूक पाहायला मिळाला आहे. तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघून, ती काहीतरी गुपित लपवतेय, असे वाटत आहे.
मनीषा कोईरालानंतर अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि अभिनेत्री आदिती रावही रॉयल लूकमध्ये दिसल्या. 'हीरामंडी: द डायमंड बाजार' या मालिकेत मनीषा कोईरालासोबत, सोनाक्षी सिन्हा, अदिती राव हैदरी, शर्मीन सहगल, रिचा चढ्ढा आणि संजीदा शेख यांच्याही महत्त्वाच्या भूमिका असणार आहेत. या वेब सीरिजच्या फर्स्ट लूक व्हिडीओमध्ये गणिकेचे प्रेम, ताकद आणि स्वातंत्र्यासाठीचा लढा चित्रित करण्यात आला आहे.
'हीरामंडी : द डायमंड बाजार'चा फर्स्ट लूक पाहून संजय लीला भन्साळींच्या प्रत्येक प्रोजेक्टप्रमाणेच ही सीरिज देखील भव्य दिव्य असणार आहे, हे स्पष्ट झाले आहे. संजय लीला भन्साळी यांची ही पहिलीच वेब सीरिज असणार आहे. या वेब सीरिजमध्ये भारत-पाकिस्तान फाळणीपूर्वीचे कथानक दाखवण्यात आले आहे. संजय लीला भन्साळी यांच्या ‘हीरामंडी’ या सीरिजची चाहत्यांना खूप दिवसांपासून प्रतीक्षा होती. संजय लीला भन्साळी त्यांच्या रॉयल टच कथांमुळे अधिक प्रसिद्ध आहेत. त्यांनी आतापर्यंत ‘देवदास’, ‘पद्मावत’, ‘बाजीराव मस्तानी’ आणि ‘गंगूबाई काठियावाडी’सारखे हिट चित्रपट देऊन रसिकांची मने जिंकली आहेत. संजय लीला भन्साळी यांनी नेहमीच आपल्या चित्रपटांमधून प्रेक्षकांना एका वेगळ्या विश्वाची सफर घडवली आहे. आता त्यांचा हा आगामी प्रोजेक्ट देखील अशाच एका हटके विषयावर असणार आहे.