हिंदी चित्रपटाच्या इतिहासात 'शोले' या चित्रपटाचे स्थान अनन्यसाधारण महत्त्वाचे आहे. या चित्रपटाची आजही प्रचंड लोकप्रियता आहे. १५ ऑगस्ट १९७५ मध्ये प्रदर्शित झालेल्या "शोले" या चित्रपटाचे यंदा सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण झाले असताना 'हजारवेळा शोले पाहिलेला माणूस' हा मराठी चित्रपट अनोख्या पद्धतीने सलाम करणार आहे. नावापासूनच वेगळेपण असलेला, तगडी स्टारकास्ट आणि अनेक राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये गाजलेला 'हजारवेळा शोले पाहिलेला माणूस' हा चित्रपट अखेर प्रदर्शित होणार आहे.
'हजारवेळा शोले पाहिलेला माणूस' या चित्रपटाच्या नावातूनच "शोले" या गाजलेल्या चित्रपटाशी कथेचा काहीतरी संबंध आहे हे स्पष्ट होते. चित्रपटाच्या नावामुळेच त्याच्या कथानकाविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. "शोले" चित्रपटाचे थरारक कथानक, त्यातील कलाकारांच्या दमदार अभिनयामुळे व्यक्तिरेखा अजरामर झाल्या. त्यामुळेच "शोले" चित्रपट आजही अविस्मरणीय आहे. "शोले" चित्रपटाच्या याच आठवणींना "हजारवेळा शोले पाहिलेला माणूस" हा चित्रपट सलाम करणार आहे.
'हजारवेळा शोले पाहिलेला माणूस' या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळवकर, सोनाली कुलकर्णी, सिद्धार्थ जाधव, प्राजक्ता दातार, मिलिंद शिंदे, किशोर कदम, बालकलाकार श्रीरंग महाजन यांच्या प्रमुख भूमिका असून अभिनेते समीर धर्माधिकारी व आनंद इंगळे हे पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत आहेत. चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन हृषिकेश गुप्ते यांनी केलं आहे. अमोल गोळे यांनी छायांकन, रोहन रोहन,स्वरुप आनंद भालवणकर, वरुण लिखाते यांनी संगीत तर विनोद पाठक यांनी संकलनाची जबाबदारी निभावली आहे. शंकरैय्या दोराईस्वामी यांनी नृत्यदिग्दर्शन तर क्रिएटिव्ह डायरेक्टर शंकरैय्या दोराईस्वामी आणि विनोद पाठक आहेत.
वाचा: बॉलिवूडच्या 'या' सुपरस्टारला बिग बॉसची ऑफर, एका भागासाठी निर्माते देणार होते ३.५ कोटी
सिद्धार्थ जाधवने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर 'हजारवेळा शोले पाहिलेला माणूस' चित्रपटाचे मोशन पोस्टर शेअर केले आहे. हे पोस्टर शेअर करत त्याने, ‘हजारवेळा शोले पाहिलेला माणूस... "शोले" चित्रपटाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या पदार्पणानिमित्त घेऊन आलो आहोत आगामी "हजार वेळा शोले पाहिलेला माणूस" या चित्रपटाची रिलीज डेट...! हा आयकॉनिक सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे… २९ नोव्हेंबरला’ असे कॅप्शन दिले आहे.
'हजारवेळा शोले पाहिलेला माणूस' हा चित्रपट २९ नोव्हेंबर २०२४पासून मोठ्या पडद्यावर येत आहे. या चित्रपटाविषयी अनेक महोत्सवांमध्ये ऐकल्यानंतर प्रेक्षकांमध्ये उत्सुकता शिगेले पोहोचली आहे. तसेच या चित्रपटातील सिद्धार्थ जाधवच्या अभिनायचे झालेले कौतुक प्रेक्षकांमधील उत्सुकता ताणत आहे. आता सर्व प्रेक्षक २९ नोव्हेंबरची वाट पाहात आहेत.