तुम्हाला अभिनेता हरमन बावेजा आठवतोय का? प्रेक्षक हरमनला अभिनेता म्हणून कमी आणि हृतिकसारखा दिसणारा व डान्स करणारा हिरो म्हणून अधिक ओळखतात. आज १३ नोव्हेंबर रोजी हरमनचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्याच्याविषयी काही खास गोष्टी...
हरमनने ‘लव्ह स्टोरी २०५०’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटात अभिनेत्री प्रियांका चोप्रा महत्त्वाच्या भूमिकेत दिसली होती. हरमनच्या या पहिल्याच चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केली नाही. मात्र प्रियांका आणि त्याची लव्ह स्टोरी चांगलीच गाजली. प्रियांका आणि हरमनचे नात फार काळ टिकले नाही. एका कार्यक्रमात हरमनने याबाबत खुलासा केला होता.
वाचा: 'नाळ २'मधील चिमीचं कास्टिंग कसं झालं? जाणून घ्या दिग्दर्शकाकडून
अफेअरविषयी बोलताना हरमन म्हणाला होता की, “त्या वेळी माझे चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरत होते. त्यामुळे माझ्यावर ताण येत होता. मला माझे लक्ष चित्रपटांवर केंद्रित करायचे होते. या गडबडीमध्ये मला प्रियांकालादेखील वेळ देता आला नाही. 'लव्ह स्टोरी २०५०’ अपयशी ठरल्यानंतर मला ‘वॉट्स यूआर राशी’ या चित्रपटाकडे विशेष लक्ष द्यायचे होते.”
पुढे तो म्हणाला, "‘वॉट्स यूआर राशी’ चित्रपटात माझी महत्त्वाची भूमिका होती. त्यामुळे दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांनी मला कामावर जास्त लक्ष देण्यास सांगितले होते. त्यामुळे प्रियांकाला वेळ देणे मला शक्य होत नव्हते. हळूहळू आमच्यात दुरावा निर्माण झाला."
प्रियांकासोबत ब्रेकअप झाल्यानंतर हरमन चित्रपटांवर लक्ष देत होता. मात्र, त्याचे चित्रपट फारशी कमाई करताना दिसले नाहीत. त्याने २०२१मध्ये हेल्थ एक्स्पर्ट साशा रामचंदानीशी लग्न केले. त्यांच्या लग्नातील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.