मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Hardeek Joshi: शिवरायांचा मर्द मावळा! ‘राणा दा’ने सोशल मीडियावर शेअर केला रांगडा लूक

Hardeek Joshi: शिवरायांचा मर्द मावळा! ‘राणा दा’ने सोशल मीडियावर शेअर केला रांगडा लूक

Harshada Bhirvandekar HT Marathi
Nov 16, 2022 01:39 PM IST

Hardeek Joshi: ‘तुझ्यात जीव रंगला’ या लोकप्रिय मालिकेतून घराघरांत पोहोचलेला ‘राणा दा’ फेम अभिनेता हार्दिक जोशी आता लवकरच ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Hardeek Joshi
Hardeek Joshi

Hardeek Joshi: ‘तुझ्यात जीव रंगला’ या लोकप्रिय मालिकेतून घराघरांत पोहोचलेला ‘राणा दा’ फेम अभिनेता हार्दिक जोशी आता लवकरच ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात हार्दिक जोशी जोशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्याच्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटात ७ मावळ्यांची शूर लढाईची कथा दाखवण्यात येणार आहे. या चित्रपटात हार्दिकचा पूर्ण लूक कसा असणार, याची झलक त्याने स्वतः सोशल मीडियावर शेअर केली आहे.

नुकताच हार्दिक जोशीने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तो मर्द मावळ्याच्या रुपात दिसत आहे. त्याने डोक्यावर मराठमोळा पटका बांधला असून, त्याच्या पाठीवर ढाल लावलेली दिसत आहे. गर्द जंगलात उभा असलेला हा शिवरायांचा मावळा जणू शत्रूला आपली आणि आपल्या स्वराज्याची ताकद दाखवत असल्याचेच भासतेय. ‘हर हर महादेव’ म्हणत त्याने हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

लाडक्या राणा दाने अर्थात हार्दिक जोशीने शेअर केलेल्या या फोटोंवर चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. या आधी चित्रपटातील मावळ्यांच्या लूकवर टीका होत होती. महाराजांचे मावळे आणि डोक्यावर फेटा-पटका नाही, पाठीवर ढाल नाही असे म्हणत अनेकांनी त्यांच्यावर टीका केली होती. मात्र, आता हार्दिक जोशीचा हा नवा लूक पाहून चाहते खूश झाले आहेत. हा खरा आमचा मर्द मावळा, असे म्हणत चाहत्यांनी त्यांचे कौतुक केले आहे. ‘सुरूवात तर झाली आहे, आता जोपर्यंत जिंकणार नाही तोपर्यंत थांबणार नाही, असे म्हणत एका चाहत्याने त्याला चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

मराठी मनोरंजन विश्वातील आघाडीचे दिग्दर्शक महेश मांजरेकर लवकरच त्यांचा ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ हा ऐतिहासिक चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या चित्रपटात ‘राणा दा’ फेम अभिनेता हार्दिक जोशी महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात हार्दिक जोशी शिवबांचा मावळा ‘मल्हारी लोखंडे’ ही भूमिका साकारणार आहे.

IPL_Entry_Point