लग्नानंतर अक्षयाने तिची कोणती सवय बदलावी? हार्दिक जोशी म्हणतो, 'ती फार...
जेव्हा लग्नानंतर अक्षयाने तिची कोणती सवय बदलावी असं तुला वाटतं हा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा हार्दिक म्हणाला…
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय जोडी हार्दिक जोशी (hardeek joshi)आणि अक्षया देवधर (akshaya deodhar) सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. हार्दिक आणि अक्षया यांची जोडी चाहत्यांची अत्यंत लाडकी आहे. 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेत झळकणाऱ्या या जोडीने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं होतं. त्यानंतर त्यांनी खऱ्या आयुष्यात एकत्र यावं अशी भावना चाहत्यांकडून व्यक्त केली जात होती. नुकताच साखरपुडा करत या जोडीने चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता. आता ते दोघे लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. त्यांनी लग्नासाठी पुण्याची निवड केली असून ते योग्य ठिकाणाच्या शोधात आहे. अशातच हार्दिकने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अक्षयाने तिच्या स्वभावात कोणता बदल करावा याबद्दल सांगितलं आहे.
ट्रेंडिंग न्यूज
हार्दिक आणि अक्षया यांनी नुकतीच छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम 'चला हवा येऊ द्या' मध्ये हजेरी लावली होती. या कार्यक्रम निवेदक निलेश साबळे याने त्यांना एकमेकांबद्दल अनेक प्रश्न विचारले. जेव्हा लग्नानंतर अक्षयाने तिची कोणती सवय बदलावी असं तुला वाटतं हा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा हार्दिक म्हणाला, ' ती माझी पत्नी होण्यापूर्वी माझी सगळ्यात जवळची आणि चांगली मैत्रीण आहे. मला तिचा स्वभाव माहित आहे. मला माहितीये ती कुठे कशी काय प्रतिक्रिया देईल. ती कोणत्या परिस्थितीमध्ये काय करेल हे मला माहितीये. पण ती फार रागीट आहे. कोणत्याही परिस्थितीत लगेच चिडते. ती रागात काहीही करते आणि काहीही बोलते. आणि तिची ही सवय तिने बदलावी असं मला वाटतं. तिने तिचा राग थोडा कंट्रोल करावा असं वाटतं.'
अक्षया आणि हार्दिक यांनी ठाण्यात ३ मे रोजी साखरपुडा केला होता. त्यांच्या साखरपुड्याने चाहत्यांचा आनंद गगनात मावत नव्हता. या सोहळ्याला 'तुझ्यात जीव रंगला' च्या टीमने हजेरी लावली होती. आता लवकरच ते लग्नबंधनात अडकणार आहेत.