Hardeek Joshi Comeback in Serial: ‘राणा दा’ बनून महाराष्ट्रातील रसिक प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा अभिनेता हार्दिक जोशी नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असतो. सध्या त्याचा ‘जाऊ बाई गावात’ हा कार्यक्रम चांगलाच गाजत आहे. दरम्यान, आता हार्दिक जोशी त्याच्या एका गाजलेल्या मालिकेत कमबॅक करताना दिसणार आहे. ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेनंतर हार्दिक जोशी ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेत देखील झळकला होता. या मालिकेत त्याने शुभंकर नावाचे पात्र साकारले होते. आता याच पात्राची मालिकेत पुन्हा एन्ट्री होणार आहे.
‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेत सध्या अतिशय रंजक वळण पाहायला मिळत आहे. एकीकडे वैदहीच्या मृत्यूचं कोड उलगडलं आहे. तर, दुसरीकडे आता मोनिकाचा भूतकाळ देखील समोर येणार आहे. गेल्या काही भागांमध्ये या मालिकेत शुभंकरची एन्ट्री झाली होती. शुभंकर या मालिकेत मोनिकाचा बॉयफ्रेंड म्हणून झळकला होता. तर, त्याने मल्हारचा प्रतिस्पर्धी म्हणून देखील कथानकात मोठा ट्वीस्ट आणला होता. मात्र, काही दिवसांपूर्वीच या पात्राने प्रेक्षकांचा निरोप घेतला होता.
परंतु, आता पुन्हा एकदा ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेच्या कथानकात शुभंकरची एन्ट्री होणार आहे. सध्या मल्हारच्या घरात राहत असलेली मंजुळा ही वैदेहीची जुळी बहिण असल्याचे समोर आले आहे. तर, मोनिकानेच वैदेहीचा खून केल्याचे समोर आले आहे. मोनिकाचं हे सत्य आता पीहू आणि स्वरासमोर आलं आहे. तर, याच दरम्यान मोनिकाच्या आयुष्यात कुणीतरी सनी नावाचा मुलगा होता. या सनीनेच मोनिकासाठी लिहिलेली प्रेमपत्र आता मल्हारच्या हाती लागली आहेत. त्यामुळे मोनिकाच्या आयुष्यात नवीन वादळ आलं आहे. हा सनी नेमका कोण याचा शोध मल्हार घेणार आहे.
या सगळ्यात आता शुभंकर पुन्हा एकदा मल्हार आणि मोनिकाच्या आयुष्यात परतून येणार आहे. शुभंकर आपणच सनी म्हणजेच मोनिकाचा बॉयफ्रेंड असल्याचं मल्हारला सांगणार आहे. यामुळे आता मल्हारला देखील मोठा धक्का बसणार आहे. आता मोनिका मल्हारला आपल्या आणि सनीच्या नात्याबद्दल सांगू शकेल का? मोनिकाचं सत्य कळल्यानंतर मल्हार तिला माफ करू शकेल का? हे ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेच्या येत्या भागांमध्ये कळणार आहे. मात्र, हार्दिक जोशीच्या एन्ट्रीमुळे मालिकेला रंजक वळण येणार आहे.