मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  हार्दिक- अक्षया पुण्यात बांधणार लग्नगाठ, कोल्हापूरहुन होते साखरपुड्याचे कपडे आता

हार्दिक- अक्षया पुण्यात बांधणार लग्नगाठ, कोल्हापूरहुन होते साखरपुड्याचे कपडे आता

Payal Shekhar Naik HT Marathi
Jun 23, 2022 01:37 PM IST

आता चाहत्यांना त्यांच्या लग्नाचे वेध लागले आहेत. अक्षया आणि हार्दिक यांनी नुकताच त्यांच्या लग्नाच्या ठिकाणाचा खुलासा केला आहे.

हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर
हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'तुझ्यात जीव रंगला' मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणारे लोकप्रिय कलाकार हार्दिक जोशी (hardeek joshi) आणि अक्षया देवधर (akshaya deodhar) सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत. त्यांनी त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. मालिकेत रील लाईफमध्ये पती पत्नी असलेले हे कलाकार खऱ्या आयुष्यात एकत्र यावे अशी अनेक चाहत्यांची इच्छा होती. आणि ती इच्छा पूर्ण देखील झाली. अक्षया आणि हार्दिक यांनी गुपचूप साखरपुडा करत चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता. आता चाहत्यांना त्यांच्या लग्नाचे वेध लागले आहेत. अक्षया आणि हार्दिक यांनी नुकताच त्यांच्या लग्नाच्या ठिकाणाचा खुलासा केला आहे.

हार्दिक आणि अक्षया यांनी नुकतीच छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम 'चला हवा येऊ द्या' मध्ये हजेरी लावली होती. या कार्यक्रम निवेदक निलेश साबळे याने त्यांना एकमेकांबद्दल अनेक प्रश्न विचारले. जेव्हा अक्षयाच्या स्वभावाबद्दल प्रश्न विचारण्यात आला तेव्हा हार्दिक म्हणाला, 'मला तिचा स्वभाव माहित आहे. ती माझी पत्नी होण्यापूर्वी माझी सगळ्यात जवळची आणि चांगली मैत्रीण आहे. मला माहितीये ती कुठे कशी काय प्रतिक्रिया देईल. ती कोणत्या परिस्थितीमध्ये काय करेल हे मला माहितीये.' त्यानंतर निलेशने त्यांना त्यांच्या लग्नाबद्दल विचारणा केली. त्यावर उत्तर देताना हार्दिक म्हणाला, 'आम्ही पुण्यात लग्न करायचा विचार करतोय. आम्ही याबद्दल विराजस कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे यांच्याशी बोललो आहोत. त्यांना लग्नासाठीची पुण्यातील बरीच ठिकाणं माहित आहेत. त्यामुळे त्याबद्दल शोध सुरू आहे पण आम्ही पुण्यातच लग्न करणार आहोत.'

 

 

साखरपुड्याबद्दल बोलताना हार्दिकने सांगितलं की, त्यांचे साखरपुड्याचे कपडे हे खास कोल्हापूरहून मागवण्यात आले होते. त्यामागचं कारण सांगताना हार्दिक म्हणाला, 'आमची पहिली मालिका 'तुझ्यात जीव रंगला' कोल्हापूरमध्ये चित्रित झाली होती. आमच्या खूप आठवणी आहेत तिथे. त्यामुळे आठवणींना उजाळा देण्यासाठी आम्ही कोल्हापूरची निवड केली.'

IPL_Entry_Point

विभाग