Hardeek Akshaya Wedding: मराठी मनोरंजन विश्वात सध्या अभिनेता हार्दिक जोशी आणि अभिनेत्री अक्षया देवधर यांच्या लग्नाची लगबग दिसत आहे. हार्दिक आणि अक्षयाच्या लग्न सोहळ्याला सुरुवात झाली असून, दोघेही आपापल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून याचे अपडेट शेअर करत आहेत. ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून ‘राणा दा’ आणि ‘पाठक बाई’ ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. या मालिकेला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून घेतलं. अभिनेता हार्दिक जोशी या मालिकेत ‘राणा दा’ साकारत होता. तर, अभिनेत्री अक्षया देवधर हिने ‘अंजली पाठक’ ही भूमिका साकारली होती.
रील लाईफमध्ये चर्चेत आलेली ही जोडी आता रिअल लाईफमध्ये देखील एकत्र दिसणार आहे. मालिकेच्या निमित्ताने खऱ्या आयुष्यात देखील राणा आणि अंजलीचा जीव एकमेकांमध्ये रंगला आहे. या वर्षी साखरपुड्याचे फोटो शेअर करत त्यांनी चाहत्यांना आनंदाची बातमी दिली होती. आता ही जोडी लग्नबंधनात अडकत आहे. हार्दिक आणि अक्षयच्या लग्न सोहळ्याला सुरुवात झाली आहे. याची झलक त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केली आहे.
अभिनेता हार्दिक जोशीने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर मेहंदी सोहळ्याचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ‘तुझ्यात जीव रंगला’ फेम ‘बरकत’ म्हणजेच अभिनेता अमोल नाईक देखील दिसत आहे. दोघांनी आपल्या हातावर छोटीशी मेहंदी काढली आहे. हार्दिकने आपल्या हातावर अक्षयाचं नाव लिहिलंय. तर, अमोलने आपल्या मेहंदीमध्ये ‘#अहा..लगीन’ असं लिहिलं आहे. या मेहंदी सोहळ्यात हार्दिक जोशीचं संपूर्ण कुटुंब दिसत आहे.
तर, दुसरीकडे अक्षयाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये मुंडावळ्या बांधलेली अक्षया देवधर वधू वेशात आपल्या कुटुंबासोबत जेवणावर ताव मारताना दिसत आहे. आपल्या सुखी वैवाहिक जीवनाची सुरुवात जेवणापासून असं म्हणत तिने हा व्हिडीओ शेअर केला आहे. यात अक्षया आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत एका हॉटेलमध्ये जेवणाचा आस्वाद घेताना दिसत आहे. लग्नाची लगबग पाहून आता चाहते देखील त्यांच्या लग्न सोहळ्याचे फोटो पाहण्यासाठी आतुर झाले आहेत.