Independence Day 2024 Songs: १५ ऑगस्ट म्हणजेच भारताचा स्वातंत्र्य दिन अगदी दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. अनेक ठिकाणी लोकांनी या मोठ्या दिवसाच्या जल्लोषाची तयारी सुरू केली आहे. कुठे परेडचा सराव सुरू झाला आहे, तर कुठे देशभक्तीपर गीते गाण्याचा सराव सुरू आहे. कुठे या दिवशी कोणती सजावट केली जाणार आहे याची तयारी सुरू आहे, तर कुठे या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून कोणाला बोलावले जाणार, याची चर्चा सुरू आहे. संपूर्ण देशाला या दिवसाचे स्वागत चेहऱ्यावर हास्य आणि मोकळ्या हातांनी करायचे आहे.
स्वातंत्र्य दिनी सगळीकडे जल्लोष सुरू असतोच. मात्र, या दिवशी सगळीकडे काही गाणी वाजत असतात. या खास दिवशी अशी काही गाणी कानावर पडतात की, जी ऐकली नाही तर तो दिवस पूर्ण झाल्यासारखा वाटतच नाही. या मराठी आणि हिंदी गाण्यांशिवाय स्वातंत्र्यदिन अगदीच अधुरा वाटतो. चला तर ऐकूया अशीच काही खास गाणी...
‘मेरे देश की धरती’ हे प्रसिद्ध गायक महेंद्र कपूर यांनी गायलेले ‘उपकार’ चित्रपटातील एक अतिशय लोकप्रिय गाणे आहे. हे असे गाणे आहे, ज्याशिवाय हा दिवस पूर्ण होऊच शकत नाही. कारण, हे गाणे जवळपास प्रत्येक सार्वजनिक ठिकाणी कार्यक्रमात वाजवले जाते. यामध्ये भारताचे अतिशय सुंदर पद्धतीने कौतुक करण्यात आले आहे.
‘जिंकू किंवा मरू’ हे गाणे आपण सगळ्यांनीच लहानपणापासून ऐकले आहे. हे गाणे १९६३मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘छोटा जवान’ या मराठी चित्रपटातील आहे. या गाण्यात स्त्री, पुरुष, आणि लहान मुले अगदी शेवटच्या श्वासापर्यंत देशासाठी लढून, जोपर्यंत आपल्या देशाला स्वातंत्र मिळत नाही, तोपर्यंत पुनर्जन्म घेत हा लढा देत राहू, असा संदेश देणारे आहे.
‘ये देश है वीर जवानों का’ हे गाणे ‘नया दौर’ चित्रपटातील आहे. जे देशासाठी बलिदान दिलेल्या सगळ्या शहीद स्वातंत्र्यसैनिकांना समर्पित आहे. यामध्ये आपल्या देशातील विविधतेची अतिशय चांगल्या पद्धतीने प्रशंसा करण्यात आली आहे.
‘शूर आम्ही सरदार आम्हाला’ या गीताची रचना शांता शेळके यांनी केली आहे. तर, हृदयनाथ मंगेशकर, हेमंत कुमार, लता मंगेशकर यांनी या गीताला आपला आवाज दिला आहे. हे गीत १९६४मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मराठा तितुका मेळवावा’ या चित्रपटातील आहे.
‘माँ तुझे सलाम’ हे गाणे ऑस्कर पुरस्कार विजेते एआर रहमानने गायले आहे. आजच्या काळात जेव्हाही देशभक्तीशी संबंधित कोणताही कार्यक्रम आयोजित केला जातो, तेव्हा एआर रहमानचे हे गाणे नक्कीच वाजवले जाते. या गाण्यानेही भारतीयांच्या हृदयात विशेष स्थान निर्माण केले आहे.
'ऐ मेरे वतन के लोगों...’ हे लता मंगेशकर यांनी गायलेले गाणे खरोखरच वीरांच्या त्याग आणि शौर्याची आठवण करून देते. या गाण्याला देशभक्तीपर प्रार्थना म्हटली, तर ते चुकीचे ठरणार नाही.