Happy Birthday Upendra Limaye: मराठी मनोरंजन विश्वातील हरहुन्नरी अभिनेता उपेंद्र लिमये यांचा आज (८ मार्च) वाढदिवस आहे. आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर केवळ मराठीच नव्हे तर हिंदी मनोरंजन विश्व गाजवणाऱ्या कलाकारांमध्ये उपेंद्र लिमये यांचे नाव अग्रणी घेतले जाते. उपेंद्र लिमये यांनी नेहमीच प्रेक्षकांचे मन जिंकून घेतले आहे. दमदार अभिनयासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला आहे. नुकतेच उपेंद्र लिमये रणबीर कपूर याच्या ‘अॅनिमल’ या चित्रपटात देखील झळकले आहेत. ‘ॲनिमल’ चित्रपटातील उपेंद्र लिमये यांच्या भूमिकेचे कौतुक होत असले, तरी सुरुवातीला त्यांना या चित्रपटात काम करायचे नव्हते. पण, नंतर असे काय झाले की, ते ‘फ्रेडी पाटील’ची भूमिका करायला तयार झाले?
‘ॲनिमल’ या चित्रपटासाठी उपेंद्र लिमये यांना जेव्हा संदीप रेड्डी वंगा यांच्या टीमकडून फोन आला, तेव्हा त्या चित्रपटातील अवघ्या १० मिनिटाच्या भूमिकेसाठी उपेंद्र यांनी थेट नकार दिला होता. मात्र, हा चित्रपट संदीप रेड्डी वंगा यांचा असल्याचे म्हणत आणि त्यांना स्वतः तुम्हाला भेटायचे असल्याचे म्हणून या टीमने उपेंद्र लिमये यांच्यासोबत संदीप रेड्डी वंगा यांची भेट ठरवली. संदीप रेड्डी वंगा हे नाव ऐकताच उपेंद्र लिमये यांनी आपल्या निर्णयाचा थोडा विचार केला. संदीप रेड्डी वंगा म्हणजे आजच्या काळातील रामगोपाल वर्मा, त्यांच्या दिग्दर्शनाची स्टाईल राम गोपाल वर्मा चित्रपटांची आठवण करून देते, उपेंद्र लिमये म्हणाले. संदीप रेड्डी यांचा अर्जुन रेड्डी हा चित्रपट उपेंद्र यांना खूप आवडला होता.
या सगळ्या गोष्टींचा विचार करून उपेंद्र लिमये यांनी संदीप रेड्डी वंगा यांना भेटण्याचा निर्णय घेतला. प्रत्यक्ष भेट झाल्यावर संदीप रेड्डी वंगा यांनी यांनी उपेंद्र लिमये यांची अशी मनधरणी केली की, उपेंद्र त्यांना नकारच देऊ शकले नाहीत. ‘ॲनिमल’मध्ये उपेंद्र लिमये यांनी रणबीर कपूरने साकारलेल्या पात्राला अर्थात रणविजयला बंदूक पुरवणाऱ्या व्यक्तीची भूमिका केली होती. अवघ्या दहा ते बारा मिनिटाच्या या भूमिकेमध्ये एक सीन असा होता, ज्यात रणबीर कपूर उपेंद्र यांची अंडरवियर घालतो. सुरुवातीला उपेंद्र लिमये या सीनबद्दल साशंक होते. रणबीर कपूर या सीनसाठी नकार देईल, असे त्यांना वाटत होते.
फ्रेडीचा हा सीन करण्यासाठी उपेंद्र लिमये यांनी आधी काचकूच केली. मात्र, संदीप रेड्डी वंगा यांनी उपेंद्र लिमये यांच्यासमोर हा सीन पडद्यावर कसा दिसेल, हे सांगितलं. हा सीन पडद्यावर दिसतांना प्रेक्षकांना त्यात कुठलीही अश्लीलता दिसणार नाही, याची काळजी घेतली जाईल, अशी शाश्वती संदीप यांनी दिली. रणबीर कपूर यासाठी नकार देईल असे वाटत असताना, मात्र तसे काहीच झाले नाही. हा सीन अगदी व्यवस्थित पार पडला. पडद्यावर देखील या सीनने चांगलाच धुमाकूळ घातला आणि लोकांनीही या सीनला डोक्यावर उचलून घेतले.