Umesh Kamat Birthday Special: मराठमोळा अभिनेता उमेश कामत याचा आज ४४वा वाढदिवस आहे. १२ डिसेंबर १९७८ रोजी मुंबईमध्येच उमेश कामत याचा जन्म झाला. मराठी मालिका, नाटक, चित्रपट आणि वेब सीरिज अशा सगळ्याच क्षेत्रात त्याने आपल्या अभिनयाची जादू पसरवली आहे. भूमिका विनोदी असो, वा गंभीर उमेश नेहमीच त्यात जीव ओतून काम करताना दिसला. उमेश प्रमाणेच त्याची पत्नी प्रिया देखील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. दोघांची लव्हस्टोरी देखील खूप खास आहे.
प्रिया बापट आणि उमेश कामत हे दोघे एकाच कॉलेजचे विद्यार्थी होते. कॉलेजमध्ये असल्यापासून प्रियाला उमेश आवडत होता. दिसायला राजबिंडा असणाऱ्या उमेशच्या मागे अनेक तरुणी फिदा होत्या. मात्र, प्रियाने आपलं प्रेम थेट व्यक्त करण्याचं धाडस केलं. एकाच इंडस्ट्रीमध्ये काम करत असल्यामुळे उमेश आणि प्रिया यांच्यामध्ये छान मैत्री होती. हळूहळू दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले होते. मात्र, या नात्यात प्रियाने पुढाकार घेत आपलं प्रेम व्यक्त केलं. प्रियाने उमेशवरील प्रेम व्यक्त केलं असलं, तरी उमेशने लगेच होकार दिला नाही.
उमेश आणि प्रिया यांच्यात तब्बल ८ वर्षांचं अंतर आहे. वयातील हेच अंतर लक्षात घेऊन उमेश होकार द्यायला वेळ घेत होता. मात्र, प्रियाच्या प्रेमापुढे त्याने हार मानली आणि तिच्या वाढदिवशी या नात्याला होकार देत त्याने गोड सरप्राईज दिलं. या बद्दलचा किस्सा त्याने स्वतः एका मुलाखतीत सांगितला होता. उमेश म्हणालेला की, ‘मी सगळेच निर्णय विचारपूर्वक आणि वेळ घेऊन घेतो. त्यामुळे या नात्यातील निर्णय घेण्यासाठी देखील मी काही वेळ घेतला होता. या नात्याला थोडा वेळ देऊ आणि ते कुठवर टीकतंय ते पाहू, असं म्हणत आम्ही दोघांनी वेळ घेतला होता.’
मात्र, प्रियाने पुन्हा एकदा विचारणा केली आणि त्याने तिच्या वाढदिवसाचं निमित्त साधत आपला होकार कळवला. यानंतर ६ वर्ष ते एकमेकांना डेट करत होते आणि त्यानंतर त्यांनी लग्नगाठ बांधली. मनोरंजन विश्वात क्युट कपल म्हणून उमेश आणि प्रियाच्या जोडीचं उदाहरण दिलं जातं.
संबंधित बातम्या