मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजेच तेजश्री प्रधान हिचा आज (२ जून) वाढदिवस आहे. अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने अनेक संघर्ष करून आजवरचा हा यशस्वी अभिनय प्रवास केला आहे. प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान मिळवणाऱ्या तेजश्रीचा अभिनय विश्वातला हा प्रवास अजिबात सोपा नव्हता. अभिनय विश्वात करिअर करण्यासाठी अगदी दिवसाची रात्र करून आणि रेल्वे प्रवास करून सेटवर पोहोचणारी मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगी तेजश्री प्रधान हीचं नाव आज आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये घेतलं जातं. ‘होणार सुन मी ह्या घरची’ या मालिकेतील ‘जान्हवी’ या पात्राने तेजश्री प्रधान लातुफान लोकप्रियता मिळवून दिली.
मुळची डोंबिवलीची असलेली तेजश्री सहज आणि सुंदर अभिनय करते. शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिने आपला कल अभिनयाकडे वळवला. खरं तर तिला अभिनेत्री व्हायचं नव्हतं. तिला एक कौन्सिलर व्हायचं होतं. मात्र, दुसऱ्या वर्षात शिकत असताना तिला अभिनयाची संधी चालून आली. आणि अभिनय करण्यासाठी तिने सायकॉलॉजी ऐवजी सोशल सायन्स हा विषय घेऊन आपली पदवी पूर्ण केली. तेजश्री प्रधान हिने चित्रपटातून मनोरंजन विश्वात पदार्पण केले होते. तिचा पहिला चित्रपट लक्ष्मी होता. मात्र, तो कधीच प्रदर्शित झाला नाही. यानंतर तिला ‘झेंडा’ नावाच्या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली.
चित्रपट विश्वातून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणारी तेजश्री प्रधान टीव्ही इंडस्ट्रीमध्ये सुपरस्टार झाली आहे. तेजश्री प्रधान हिचा जन्म २ जून १९९८ रोजी झाला. तिने काही मराठी चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये ही काम केले आहे. ती मूळची डोंबिवलीची असल्याने अभिनय क्षेत्रात काम करण्यासाठी भल्या पहाटे उठून ती लोकल ट्रेनमधून प्रवास करायची. ‘या गोजिरवाण्या घरात’ या मालिकेद्वारे तिने टीव्ही विश्वात पदार्पण केले. यानंतर तिला ‘लेक लाडकी या घरची’ या मालिकेतही मुख्य भूमिका साकारण्याची संधी मिळाली. त्यानंतर ‘झेंडा’ हा तिचा चित्रपट २०१०मध्ये प्रदर्शित झाला. पुढे तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केले.
मुख्य अभिनेत्री म्हणून ‘लेक लाडकी या घरची’ ही तेजश्रीची पहिली मालिका असली, तरी ‘होणार सून मी ह्या घरची’ या २०१३ मध्ये प्रसारित झालेल्या मालिकेने तेजश्री प्रधान हिला घराघरात ओळख मिळवून दिली. त्या मालिकेनंतर तेजश्री प्रधान हिच्या लोकप्रियतेतही तुफान वाढ झाली. चित्रपट आणि मालिका करताना तेजश्रीने नाटकांमध्येही काम केलं. ‘कार्टी काळजात घुसली’, ‘मैं और तुम’ अशा नाटकांत काम करून तिने हिंदी आणि मराठी दोन्ही रंगभूमी गाजवल्या. सध्या तेजश्री प्रधान ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत असून, तिच्या या मालिकेला देखील प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळताना दिसत आहे.
संबंधित बातम्या