Happy Birthday Swapnil Joshi: आजवर अनेक कलाकारांनी पडद्यावर श्रीकृष्णाची व्यक्तिरेखा साकारली आहे. मात्र, यातील काहीच कलाकार नेहमीच प्रेक्षकांच्या लक्षात राहिले आहेत. यातीलच एक नाव म्हणजे अभिनेता स्वप्नील जोशी. स्वप्नील जोशीने ‘श्रीकृष्ण’ या मालिकेत ‘कृष्णा’ची व्यक्तिरेखा साकारत तुफान प्रसिद्धी मिळवली होती. ‘श्रीकृष्ण’ या टीव्ही मालिकेने देखील एकेकाळी खूप लोकप्रियता मिळवली होती. या मालिकेचा मुख्य अभिनेता स्वप्नील जोशी आज (१८ ऑक्टोबर) आपला वाढदिवस साजरा करत आहे. ९०च्या दशकातील प्रसिद्ध मालिकांच्या यादीमध्ये ‘श्रीकृष्ण’ या मालिकेचे नाव आघाडीवर होते. या मालिकेत स्वप्नील जोशीला पाहून लोक इतके प्रभावित झाले होते की, त्याला वास्तविक जीवनातही श्रीकृष्ण मानू लागले. याच कारणामुळे ९०च्या दशकात प्रत्येक घरात स्वप्नील जोशीचा स्वतःचा चाहता वर्ग होता.
स्वप्नील जोशीचा जन्म १८ ऑक्टोबर १९७७ रोजी मुंबईत झाला. स्वप्नील जोशीने बालकलाकार म्हणून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. १९८६मध्ये त्याने रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ या मालिकेत स्वप्नील जोशीने ‘कुश’ची भूमिका साकारली होती. यानंतर त्याला रामानंद सागर यांचा शो 'कृष्णा'मध्ये मुख्य भूमिका साकारण्याची संधी मिळाली होती. या शोने स्वप्नील जोशीला टीव्ही जगतात रातोरात लोकप्रिय केले. आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर स्वप्नीलने टीव्हीवरून मोठ्या पडद्यावरही प्रवेश केला.
लोक स्वप्नील जोशीला प्रत्यक्ष जीवनात श्रीकृष्ण मानून त्यांची पूजा करू लागले होते. त्यावेळी अशी परिस्थिती निर्माण झाली होती की, एका कार्यक्रमात त्याला स्टेजवर पोहोचायला तब्बल २ तास लागले होते. एका मुलाखतीत स्वप्नील जोशीने स्वतः हा किस्सा सांगितला होता की, तो एका कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून गेला होता. पण, त्याला पाहून लोकांना पुन्हा एकदा श्रीकृष्णाचा भास झाला, आणि लोकांनी त्याला देव मानून, त्याची पूजा आणि चरणस्पर्श करून आशीर्वाद घ्यायला सुरुवात केली. यामुळे त्याला कार्यक्रमाच्या स्टेजपर्यंत पोहोचण्यासाठी दोन तासांपेक्षा जास्त वेळ लागला.
पडद्यावर श्रीकृष्णाची रासलीला साकारणाऱ्या स्वप्नील जोशीने खऱ्या आयुष्यातही दोनदा लग्न केले आहे. स्वप्नील जोशी कॉलेजमध्ये असताना अपर्णा नावाच्या मुलीच्या प्रेमात पडला होता. २००५मध्ये स्वप्नीलने अर्पणासोबत लग्न केले. मात्र, त्यांचे हे लग्न फार काळ टिकले नाही. २००९मध्ये घटस्फोटानंतर स्वप्नील जोशीने २०११मध्ये लीनासोबत दुसरे लग्न केले. आता लीना आणि स्वप्नील या जोडीला एक मुलगा आणि एक मुलगी आहे.