Happy Birthday Sunny Deol : बॉलिवूडमध्ये असे अनेक अभिनेते झाले आहेत, ज्यांची रोमँटिक हिरो अशी ओळख बनली होती. तर असे अनेक कलाकार होते, जे त्यांच्या ॲक्शनसाठी प्रसिद्ध होते. पण, त्याचवेळी असेही काही हिरो आहेत, ज्यांना त्यांच्या रोमँटिक सीन्ससाठी जितकी वाहवा मिळाली, तितकीच त्यांना त्यांच्या ॲक्शनसाठी साठी देखील कौतुकाची थाप मिळाली. सनी देओल हा त्यापैकीच एक. सनीने त्याच्या करिअरमध्ये अनेक चित्रपट दिले, जे सुपरहिट ठरले. त्याने ॲक्शन सीनप्रमाणेच रोमँटिक आणि इमोशनल सीनही केले. सनीच्या डान्सचाही एक वेगळा चाहता वर्ग आहे. आज सनी देओल त्याचा वाढदिवस साजरा करत आहे. याच निमित्ताने जाणून घेऊया त्याच्याबद्दल एक खास किस्सा...
१९९६मध्ये रिलीज झालेल्या 'जीत' चित्रपटात सनी देओल, करिश्मा कपूर आणि सलमान खान यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. या चित्रपटात सनीच्या ॲक्शनने आणि सलमानच्या रोमँटिक स्टाईलने लोकांची मने जिंकली, तर करिश्मानेही आपल्या दमदार अभिनयाने चित्रपटाला मोहिनी घातली. पण हा चित्रपट अजूनही त्यातील एका गाण्यासाठी ओळखला जातो, जो सनीच्या कारकिर्दीतील सर्वात हिट गाण्यांपैकी एक आहे. ते गाणं म्हणजे 'यारा ओ यारा'.
या चित्रपटातील गाण्यात सनी देओलने जबरदस्त डान्स मूव्हज दाखवल्या. हा अभिनेता सर्वोत्कृष्ट डान्सर, नसला तरी त्याला नृत्याची चांगली जाण होती. या गाण्याचे शूटिंग स्वित्झर्लंडमध्ये सुरू होते. चित्रपटाचा संपूर्ण क्रू देखील तेथे उपस्थित होता. परंतु, सनीला सर्वांसमोर ‘यारा ओ यारा’चे शूटिंग करण्यात अडचण येत होती. सनीला गाण्याचे स्टेप्स नीट फॉलो करता येत नव्हते आणि त्यामुळे तो खूप घाबरला होता. सनीच्या व्यतिरिक्त गाण्याच्या कोरिओग्राफरलाही वाटले की, जर लोकांनी सेटवर अभिनेत्याचा डान्स पाहिला तर ते नक्कीच हसतील.
अशा परिस्थितीत जेव्हा गाण्याच्या शूटिंगचा दिवस आला, तेव्हा सेटचे सर्व नियम बदलण्यात आले. त्या दिवशी सनी देओलसाठी संपूर्ण सेट रिकामा करण्यात आला होता. तिथे मोजकेच लोक उपस्थित होते. आपला डान्स पाहून लोक नुसते हसतील की, काय अशी भीती सनीला सतत वाटत होती. साजिद नाडियादवाला यांनी आपल्या एका मुलाखतीत याचा खुलासा केला होता. त्याने असेही सांगितले की, शॉट दिल्यानंतर सनी विचारायचा की, तो नीट झाला आहे की नाही? पण, गंमत म्हणजे सनीच्या डान्स मूव्ह्स ज्यावर लोक हसायचे, त्याचेच लोक वेडे झाले आणि हे गाणे त्याचे ओळख बनले.