मराठी मनोरंजन विश्वातील ‘हँडसम हंक’ अर्थात अभिनेते सुनील बर्वे यांचा आज (३ ऑक्टोबर) वाढदिवस आहे. सुनील बर्वे यांनी वयाची ५७ वर्षे पूर्ण केली आहेत. मात्र, आजही त्यांच्याकडे बघून त्यांच्या वयाचा अंदाज लावता येत नाही. सुनील बर्वे यांचा मान्राठी मनोरंजन विश्वातील एकूण प्रवास चांगलाच थक्क करणारा आहे. मात्र, सुनील बर्वे अगदी ओघाओघानेच अभिनयात आले. या आधी ते नोकरी करत होते. चला तर, त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने जाणून घेऊया काही खास गोष्टी...
३ ऑक्टोबर १९६६ रोजी मुंबईमध्ये जन्मलेल्या सुनील बर्वे यांनी आपल्या करिअरची सुरुवात एक मेडिकल रिप्रेजेंटेटिव्ह म्हणून केली होते. त्याकाळी ते प्रामाणिकपणे नोकरी करत होते. परंतु, त्यांचे मन या कामात रमत नव्हते. सुरुवातीपासून त्यांना अभिनयाची ओढ लागली होती. आणि म्हणूनच त्यांनी नोकरीसोबतच अभिनयाची वाट धरली. आज, ते एक सुप्रसिद्ध अभिनेते आणि रेडिओ जॉकी म्हणून देखील ओळखले जातात.
सुनील यांचा अभिनयाचा प्रवास काहीसा अनपेक्षित होता. नोकरी करत असताना, ते गायन आणि तबल्याच्या क्लासमध्ये देखील जात होते. त्याचवेळी, एका लहानशा थिएटर ग्रुपसोबत काम करण्याची संधी त्यांना मिळाली. या ग्रुपमध्ये असतानाच त्यांना विनय आपटे यांच्या 'अफलातून' या नाटकात काम करण्याची संधी मिळाली. या नाटकात त्याच्यासोबत महेश मांजरेकर, अतुल परचुरे, आणि सचिन खेडेकर यांसारखे दिग्गज कलाकार होते. हे सर्वजण आज मराठी चित्रपटसृष्टीतील नावाजलेले चेहरे आहेत.
सुनील बर्वे आज घडीलाही मनोरंजन विश्वातील सर्वात फिट अभिनेत्यांपैकी एक मानले जातात. वयाच्या ५७व्या वर्षीही त्यांचा लूक तरुणांना लाजवेल असा आहे. त्यांच्या शाकाहारी जीवनशैली आणि नियमित व्यायामामुळे त्यांना चांगली तब्येत ठेवणे शक्य झाले आहे, असे ते स्वतः सांगतात. ‘प्रेक्षकांचे प्रेम आणि समर्थन यामुळे माझ्या चेहऱ्यावर सतत आनंद असतो, ज्यामुळे मी आजही इतका तरुण दिसतो’, असं सुनील बर्वे नेहमी म्हणतात.
सुनील बर्वे यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीत अनेक हिट चित्रपट आणि नाटकांमध्ये काम केले आहे. त्यांच्या अभिनयातील वेगळेपण आणि विविधता नेहमीच प्रेक्षकांच्या मनात आपला ठसा उमटवते. त्याच्या कामातील गंभीरता आणि नावीन्य नेहमीच त्यांना एक वेगळी ओळख मिळवून देते. अभिनयाच्या क्षेत्रात सुनील बर्वेने घेतलेला हा प्रवास प्रेरणादायी आहे. त्याच्या कामाची आणि मेहनतीची गाथा अनेकांना प्रेरणा देत राहील.
संबंधित बातम्या