Happy Birthday Suniel Shetty: बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी याची ९०च्या दशकांतील बॉलिवूडमधील हिट कलाकारांमध्ये गणना होते आणि आजही त्याने त्यांचे फिल्मी करिअर सुरू ठेवले आहे. एक काळ असा होता की, सुनील शेट्टीच्या सिनेमांसाठी लोक थिएटरबाहेर लांबच लांब रांगा लावून उभे असायचे. सुनील शेट्टीने आपल्या अभिनयाने आणि आपल्या खास शैलीने लोकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. आज म्हणजेच ११ ऑगस्ट रोजी सुनील शेट्टी त्याचा ६३वा वाढदिवस साजरा करत आहेत.
त्याची मजबूत शरीरयष्टी असो किंवा त्याचे ॲक्शन चित्रपट किंवा त्याचे नेहमीचे भारदस्त संवाद, सुनील शेट्टीने चित्रपटसृष्टीत नेहमीच स्वत:चे मोठे नाव कमावले आहे. परंतु, तुम्हाला माहित आहे का की, त्याला सुरुवातीपासूनच क्रिकेटर बनायचे होते. आणि त्याचे हेच त्याचे स्वप्न होते. मात्र, ते आजही पूर्ण झाले नाहीत. आज सुनील शेट्टी फक्त चित्रपटांपुरता मर्यादित नसून, त्याने हॉटेल उद्योग आणि व्यवसाय क्षेत्रातही आपले नाव कमावले आहे. मात्र, सुनील शेट्टीकडे असणारी ही प्रसिद्धी आणि संपत्ती अभिनेत्याने स्वतः कमावलेली आहे. त्याला वारसाहक्काने यातलं काहीच मिळालेलं नाही. प्रत्येक गोष्ट त्याने अतिशय मेहनतीने स्वतः कमावली आहे.
सुनील शेट्टी याचा जन्म ११ ऑगस्ट १९६१ रोजी कर्नाटकातील मंगळूरच्या मुल्की शहरात एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यानंतर त्यांचे वडील वीरप्पा शेट्टी यांना त्या शहरात काम मिळत नसल्याने, ते कामाच्या शोधात मुंबईत आले. मुंबईतील एका इमारतीत सफाई कामगार म्हणून ते काम करू लागले. त्यावेळी संपूर्ण कुटुंब जुहू परिसरात राहू लागले. पुढे यशस्वी झाल्यानंतर त्याचे वडील ज्या ठिकाणी सफाई कामगार म्हणून काम करायचे, त्या सर्व इमारती सुनील शेट्टीने विकत घेतल्या. सुनील जेव्हा चित्रपट क्षेत्रात करिअर करायला आला, तेव्हा लोकांनी त्याला ही इंडस्ट्री सोडण्याचे खूप सल्ले दिले. पण, सुनील शेट्टीच्या नशिबात काहीतरी वेगळंच होतं. सुनील शेट्टी ९०च्या दशकांतील सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता म्हणून काम करत होता.
सुनील शेट्टीने १९९२मध्ये आलेल्या 'बलवान' चित्रपटातून आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली. यानंतर १९९४मध्ये त्याचा 'मोहरा' हा सुपरहिट चित्रपट आला. यानंतर आलेल्या 'गोपी किशन'मध्ये त्याने दुहेरी भूमिका केली. सुनीलचा 'धडकन' हा सुपरहिट चित्रपट २००१मध्ये प्रदर्शित झाला होता. 'धडकन' चित्रपटासाठी सुनील शेट्टीला सर्वोत्कृष्ट खलनायकाचा पुरस्कार मिळाला. सुनील शेट्टीने 'ये तेरा घर ये मेरा घर' चित्रपटात काम केले. त्याचा 'हेरा फेरी' हा विनोदी चित्रपट देखील सुपरहिट ठरला होता.