बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक-निर्माते संजय लीला भन्साळी यांच्या ‘हीरामंडी: द डायमंड बाजार’ या वेब सीरिजमुळे चर्चेत असलेल्या अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिने ‘दबंग’ या चित्रपटातून सलमान खानसोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. सोनाक्षीने कधीही अभिनेत्री होण्याचा विचार केला नव्हता. याचे मुख्य कारण म्हणजे तिचे वजन खूपच वाढलेले होते. यामुळे आपण कधीच अभिनेत्री होऊ शकत नाही, असे तिला वाटत होते. चित्रपटांमध्ये येण्यापूर्वी ती कॉस्च्युम डिझायनर होती. ‘मेरा दिल लेके देखो’ या चित्रपटातील पोशाखही तिने डिझाइन केले होते. सोनाक्षीने एका फॅशन शोमध्ये सलमानला भेटली, जिथे त्याने तिला फिट होण्याचा सल्ला दिला आणि नंतर तिला त्याच्याच चित्रपटातून चमकण्याची संधी दिली. शत्रुघ्न सिन्हा आणि पूनम सिन्हा यांची मुलगी सोनाक्षी हिचा जन्म २ जून १९८७ रोजी झाला. तिच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया काही खास गोष्टी...
बॉलिवूडमधील कलाकारांबद्दलच्या अफवा पसरणं ही काही नवीन गोष्ट नाही. सोनाक्षी जेव्हा पहिल्यांदा चित्रपटांमध्ये दिसली, तेव्हा तिच्याबद्दल असे म्हटले जात होते की, ती शत्रुघ्न सिन्हा आणि रीना रॉय यांची मुलगी आहे. रीना रॉय ही ७० आणि ८० च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री होती. शत्रुघ्न सिन्हा आणि रीना रॉय या दोघांनी ‘कालिचरण’ या चित्रपटात काम केले होते. या दरम्यान त्यांची मैत्री झाली आणि नंतर मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले होते. मात्र, हे प्रेम लग्नापर्यंत पोहोचले नाही. जेव्हा सोनाक्षीचा ‘दबंग’ चित्रपट आला, तेव्हा तिच्या लूकची तुलना रीना रॉयशी होऊ लागली होती. दोघींचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले जाऊ लागले होते, ज्यात त्यांचे चेहरे अगदी सारखे दिसत होते.
सोनाक्षी सिन्हाला योगायोगाने भेटल्यावर रीना रॉय फर्स्टपोस्टला दिलेल्या मुलाखतीत मोकळेपणाने बोलली होती. यावेळी बोलताना रीना रॉय म्हणाली की, हे केवळ जीवनातील योगायोग आहेत. जीतू जी (जितेंद्र)ची आई आणि माझी आई या देखील अगदी जुळ्या बहिणींसारख्या दिसत होत्या.
२०१३मध्ये एका मुलाखतीत जेव्हा सोनाक्षी सिन्हाला तिचे वडील शत्रुघ्न सिन्हा आणि रीना रॉय यांच्या अफेअरबद्दल विचारण्यात आले, तेव्हा तिने सांगितले की, त्यावेळी तिचा जन्मही झाला नव्हता. ती मोठी होत असताना तिला याची कल्पना आली. यासाठी मी माझ्या वडिलांना सुळावर चढवू शकत नाही, असे सोनाक्षी म्हणाली होती. तर, रीना रॉयला भेटल्यावर सोनाक्षी म्हणाली होती की, 'मला वाटते की, मी माझ्या आईसारखीच दिसते.'
संबंधित बातम्या