Happy Birthday Sidharth Malhotra: बॉलिवुडचा हँडसम हंक ‘शेरशाह’ फेम अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आज (१६ जानेवारी) त्याचा वाढदिवस साजरा करत आहे. सिद्धार्थ मल्होत्राचा जन्म १६ जानेवारी १९८५ रोजी दिल्लीत झाला होता. दिल्लीतूनच त्याने त्याचे प्राथमिक शिक्षण व महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच सिद्धार्थ मल्होत्रा याने मॉडेलिंगच्या जगतात प्रवेश केला होता. आपला वैयक्तिक खर्च भागवण्यासाठी सिद्धार्थने मॉडेलिंग हे क्षेत्र निवडलं होतं. केवळ काही काळासाठी मॉडेलिंगचा विचार करत असलेल्या सिद्धार्थने हळूहळू या क्षेत्रात खूप नाव कमावले. यानंतर त्याने अभिनय विश्वात नशीब आजमावण्याचा निर्णय घेतला.
मनोरंजन विश्वात अभिनेता म्हणून पाऊल ठेवण्यापूर्वी त्याने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करण्यास सुरुवात केली होती. या आधी त्याने काही जाहिरातींमध्ये काम देखील केले होते. अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा २००८ मध्येच बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार होता. प्रियांका चोप्रा, कंगना रनौत यांच्या मुख्य भूमिका असलेल्या 'फॅशन' या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर एन्ट्री घेणार होता. मात्र, त्यावेळी एका मॉडेलिंग मॅगझिनसोबत सुरू असलेल्या करारामुळे सिद्धार्थला ती भूमिका आणि चित्रपट स्वीकारता आला नाही. त्यामुळे त्याचं फिल्मी दुनियेतलं पदार्पण देखील लांबणीवर पडलं. मात्र, यानंतरही त्याची अभिनयाची आवड जराही कमी झाली नाही. त्याने नेहमीच आपले प्रयत्न सुरू ठेवले.
सिद्धार्थ मल्होत्राला त्याच्या पहिल्या ऑडिशनमध्ये नकार देण्यात आला होता, याचा खुलासा स्वतः अभिनेत्याने एका मुलाखतीत केला होता. चित्रपटासाठी रिजेक्ट झाल्यानंतर त्याला एका जाहिरातीची ऑफर मिळाली. यानंतर २०१०मध्ये त्याने करण जोहरच्या ‘माय नेम इज खान’मधून सहाय्यक दिग्दर्शक म्हणून चित्रपट सृष्टीत पदार्पण केले. यानंतर करणने त्याला ‘स्टुडंट ऑफ द इयर’ या चित्रपटात मुख्य अभिनेता म्हणून काम करण्याची संधी दिली. या चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर सिद्धार्थ मल्होत्राने कधीच मागे वळून पाहिले नाही.
बदलत्या वेळेनुसार त्याने आपल्या अभिनयात सुधारणा केली आणि अनेक बड्या स्टार्ससोबत चित्रपटही करत राहिला. ‘एक व्हिलन’ हा बॉलिवूड चित्रपट त्याच्या कारकिर्दीचा सर्वात मोठा टर्निंग पॉइंट बनला. मोहित सूरी दिग्दर्शित ‘एक व्हिलन’ या चित्रपटात अभिनेत्री श्रद्धा कपूरसोबत तो मुख्य भूमिकेत झळकला होता. त्यांचा हा चित्रपट लोकांना खूप आवडला होता. सिद्धार्थने आपल्या फिल्मी करिअरमध्ये अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. ‘कपूर अँड सन्स’, ‘हसी तो फसी’, ‘शेरशाह’ यांसारख्या चित्रपटांतील त्याचा अभिनय प्रेक्षकांना खूप आवडला.
संबंधित बातम्या