Happy Birthday Shriya Saran: बॉलिवूडपासून टॉलिवूडपर्यंत आपल्या नितळ सौंदर्याने आणि दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या अभिनेत्री श्रिया सरन हिचा आज (११ सप्टेंबर) ४२वा वाढदिवस आहे. अभिनेत्रीचा जन्म ११ सप्टेंबर १९८२ रोजी हरिद्वार, उत्तराखंड येथे झाला. श्रिया जितकी उत्तम अभिनेत्री आहे, तितकीच ती एक उत्कृष्ट नृत्यांगना देखील आहे. तिने आपल्या सौंदर्याने नेहमीच सगळ्यांना वेड लावले आहे. आर माधवनच्या ‘रहना है तेरे दिल में’ या चित्रपटासाठी सुरुवातीला दिया मिर्झाच्या जागी श्रियाची निवड झाली होती. मात्र, तिने असं काही केलं की, तिला या चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. अभिनेत्रीच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया नेमकं काय घडलं होतं आणि त्यामागचा किस्सा...
श्रिया सरनचा जन्म हरिद्वारमध्ये झाला. मात्र, तिचे शिक्षण दिल्लीत पूर्ण झाले. वास्तविक, अभिनेत्रीचे वडील पुष्पेंद्र सरन हे भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड (BHEL) मध्ये काम करायचे. तर, तिची आई नीरजा सरन या दिल्ली पब्लिक स्कूलमध्ये शिक्षिका होत्या. लहानपणापासूनच श्रियाचा नृत्याकडे प्रचंड कल होता. हे पाहता अभिनेत्रीच्या कुटुंबीयांनी तिला शास्त्रीय आणि समकालीन नृत्याचे प्रशिक्षण घेऊ दिले. या अभिनेत्रीने कॉलेजच्या काळात अनेक स्पर्धांमध्ये भाग घेतला होता.
श्रिया सरनला कॉलेजमध्ये असतानाच रेणू नाथनच्या 'थिरकटी क्यूं हवा' या म्युझिक अल्बममध्ये काम करण्याची संधी मिळाली. दरम्यान, या अभिनेत्रीला रामोजी फिल्म्सच्या 'इष्टम' या साऊथ चित्रपटात काम करण्याची संधीही मिळाली. मात्र, या अभिनेत्रीला सर्वाधिक ओळख 'दृश्यम' या बॉलिवूड चित्रपटातून मिळाली. या चित्रपटातील अभिनेत्रीची शांत आणि निरागस गृहिणी शैली प्रेक्षकांना आवडली. या चित्रपटात ती अजय देवगणसोबत मुख्य भूमिकेत दिसली होती.
अभिनेत्री श्रिया सरनने बॉलिवूड रोमँटिक चित्रपट 'रेहना है तेरे दिल में'साठी ऑडिशनही दिले होते. या चित्रपटासाठी सुरुवातीला तिची निवड देखील झाली. या चित्रपटातील एका सीनमध्ये अभिनेत्रीला फक्त आर माधवनच्या डोळ्यात बघून ‘आय लव्ह यू’ म्हणायचं होतं. श्रियाने माधवनच्या डोळ्यात पाहून ‘आय लव्ह यू; म्हटलं की तिला खूप हसू यायचं. तिने एक-दोन वेळा नव्हे, तर अनेकदा हा प्रयत्न केला. मात्र, दरवेळी तिला आपलं हसू आवरता येत नव्हतं. अखेर तिने स्वतःच यातून माघार घेतली. नंतर हा चित्रपट दिया मिर्झाकडे गेला.