मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Shreyas Talpade Birthday: कधीकाळी खाण्यासाठी नव्हते पैसे; आता कोट्यवधी कमवतोय श्रेयस तळपदे!
Shreyas Talpade
Shreyas Talpade

Shreyas Talpade Birthday: कधीकाळी खाण्यासाठी नव्हते पैसे; आता कोट्यवधी कमवतोय श्रेयस तळपदे!

27 January 2023, 7:27 ISTHarshada Bhirvandekar

Happy Birthday Shreyas Talpade: आज जरी श्रेयस मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेता असला, तरी यासाठी त्याला प्रचंड संघर्ष करावा लागला आहे.

Happy Birthday Shreyas Talpade: मराठी मनोरंजन विश्वच नव्हे, तर आपल्या दमदार अभिनयाने बॉलिवूडमध्ये देखील हक्काची जागा निर्माण करणारा अभिनेता म्हणजे श्रेयस तळपदे. मालिका असो, नाटक वा चित्रपट श्रेयस तळपदेने आपल्या प्रत्येक भूमिकेतून प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले आहे. आज (२७ जानेवारी) अभिनेता आपला वाढदिवस साजरा करत आहे. आज जरी श्रेयस मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेता असला, तरी यासाठी त्याला प्रचंड संघर्ष करावा लागला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

श्रेयस तळपदेने केवळ अभिनयच नव्हे, तर आपल्या आवाजाने देखील चाहत्यांना भुरळ घातली आहे. आवाजाच्या दुनियेत अर्थात डबिंग क्षेत्रातही श्रेयसने धुमाकूळ घातला आहे. ‘पुष्पा: द राईज’ या चित्रपटात त्याने अल्लू अर्जुनने साकारलेल्या ‘पुष्पा’ या पात्राला आपला आवाज दिला आहे. याशिवाय श्रेयस तळपदे निर्माता आणि दिग्दर्शक देखील आहे. तब्बल २० वर्षांच्या अभिनय कारकिर्दीत श्रेयस तळपदे याने अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. कुणीही ‘गॉडफादर’ नसताना श्रेयस तळपदे याने बॉलिवूडमध्ये आपले अढळ स्थान निर्माण केले आहे.

मुंबईत जन्मलेल्या श्रेयसचं कुटुंब मनोरंजन विश्वात सक्रिय होतं. प्रसिद्ध अभिनेत्री जयश्री टी या श्रेयस तळपदेच्या आत्या होत्या. मात्र, मनोरंजन विश्वात स्थिरावण्यासाठी श्रेयसने कधीही कुणाची मदत घेतली नाही. श्रेयसच्या आयुष्यात एक अशीही वेळ आली होती, जेव्हा त्याच्याकडे खाण्यासाठी देखील पैसे नव्हते. आता प्रत्येक चित्रपटासाठी २-३ कोटींचे मानधन आकारणाऱ्या श्रेयस तळपदे याच्याकडे कधीकाळी घरभाड्याचे पैसे देखील नसायचे.

स्ट्रगल करत असताना सतत स्टुडीओची दारं फिरावी लागायची. अशावेळी तिथे पोहचण्यासाठी बस तिकिटाचे पैसे नसल्याने तो अनेकदा चालत प्रवास करायचा. मात्र, त्याचा हाच संघर्ष त्याला यशाच्या शिखरापर्यंत घेऊन गेला. ‘पछाडलेला’, ‘इकबाल’, ‘वेलकम टू सज्जनपूर’, ‘आपडी थापडी’, ‘गोलमाल’ अशा अनेक चित्रपटांत त्याने दमदार भूमिका साकारल्या आहे. केवळ चित्रपटच नव्हे तर, मालिका विश्वात देखील तो सक्रिय आहे. ‘अमानत’, ‘दामिनी’, ‘माय नेम इज लखन’, ‘माझी तुझी रेशीमगाठ’ अशा मालिकांमधून तो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.