Happy Birthday Shreya Ghoshal: बॉलिवूडची सुंदर गायिका श्रेया घोषाल हिला वेगळ्या ओळखीची गरज नाही. तिचा सुरेल आवाज हीच तिची ओळख आहे. श्रेया घोषाल ही चित्रपटसृष्टीतील अशा गायिकांपैकी एक आहे, जिने आपल्या सुरेल आवाजाने फार कमी वेळात प्रचंड यश मिळवले. तिने गायलेली सगळीच गाणी श्रोत्यांना खूप आवडतात. आज (१२ मार्च) श्रेय घोषाल हिचा वाढदिवस आहे. पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद येथे श्रेय घोषाल हिचा जन्म झाला आहे. १९८४ मध्ये जन्मलेली श्रेया घोषाल आज तिचा ४०वा वाढदिवस साजरा करत आहे. तुम्हाला माहित आहे का, की अमेरिकेत श्रेया घोषाल हिच्या नावाने एक दिवस साजरा केला जातो.
श्रेया घोषाल ही बॉलिवूडमधील अतिशय प्रसिद्ध गायकांपैकी एक आहे. वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी तिने गायनाचे प्रशिक्षण घ्यायला सुरुवात केली होती. श्रेयाची पहिली शिक्षिका ही तिची आई होती. 'देवदास' या चित्रपटासाठी तिने पहिले गाणे 'बैरी पिया' गायले होते. त्यावेळी श्रेया अवघ्या १६ वर्षांची होती. या पहिल्याच गाण्याने तिला रातोरात स्टार बनवले. वयाच्या १८व्या वर्षी श्रेयाने गायनात पहिला राष्ट्रीय पुरस्कार जिंकला. झी टीव्हीच्या लोकप्रिय सिंगिंग रिॲलिटी शो 'सारेगामापा चाईल्ड स्पेशल' या २००० साली आलेल्या शोची ती विजेती होती. दिवंगत दिग्गज गायिका लता मंगेशकर, जगजीत सिंह आणि किशोर कुमार यांना श्रेया आपले आदर्श मानते.
श्रेयाने तिच्या गायनासाठी एकूण ६ फिल्मफेअर पुरस्कार आणि ४ राष्ट्रीय पुरस्कार जिंकले आहेत. आता ती अनेक सिंगिंग रिॲलिटी शोमध्ये जज पदाची धुरा देखील सांभाळताना दिसते. विशेष म्हणजे अमेरिकेत दरवर्षी २६ जून रोजी 'श्रेया घोषाल डे' साजरा केला जातो. गायिका श्रेया घोषाल हिला अमेरिकेतील ओहायो राज्याने सन्मानित केले आहे. तेथील राज्यपाल टेड स्ट्रिकलँड यांनी २६ जून २०१० हा दिवस 'श्रेया घोषाल दिवस' म्हणून घोषित केला होता. फोर्ब्स इंडियाच्या टॉप १०० सेलिब्रिटींच्या यादीत तिचा पाच वेळा समावेश झाला आहे. जगप्रसिद्ध मादाम तुसाद संग्रहालयात श्रेयाचा मेणाचा पुतळा देखील आहे. मादाम तुसादमध्ये जागा मिळवणारी श्रेया पहिली गायिका आहे. ५ फेब्रुवारी २०१५ रोजी श्रेयाने तिचा बालपणीचा मित्र शिलादित्य मुखोपाध्यायसोबत लग्न केले. दोघांना देवयान नावाचा मुलगा आहे.
संबंधित बातम्या