प्रसिद्ध बॉलिवूड आणि टीव्ही अभिनेते शिवाजी साटम यांचा आज (२१ एप्रिल) वाढदिवस आहे. प्रेक्षक आणि चाहते त्यांना ‘एसीपी प्रद्युम्न’ या नावानेही अधिक ओळखतात. शिवाजी साटम यांनी बॉलिवूड चित्रपटांतून प्रसिद्धी मिळवली आणि त्याहीपेक्षा ते छोट्या पडद्यावरही प्रचंड लोकप्रिय ठरले. अनेक बड्या कलाकारांसोबत काम करून त्यांनी चित्रपटाच्या पडद्यावर आपली खास छाप सोडली आहे. वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया त्यांच्याविषयी काही खास गोष्टी...
अभिनेते शिवाजी साटम यांचा जन्म २१ एप्रिल १९५० रोजी माहीम, महाराष्ट्र येथे झाला. त्यांचे संपूर्ण शिक्षणही महाराष्ट्रात झाले. शिवाजी साटम यांनी भौतिकशास्त्राची पदवी घेतली होती. त्यानंतर त्यांनी बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये डिप्लोमाचे शिक्षण घेतले. अभिनयाच्या जगातात येण्यापूर्वी शिवाजी साटम सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये कॅशियर म्हणून काम करत होते. बँकेतील नोकरी करत असतानाच ते अभिनयाच्या आवडीमुळे रंगभूमीवर काम करू लागले.
यानंतर शिवाजी साटम यांनी बराच काळ रंगभूमीवर अभिनय केला. शिवाजी साटम यांनी १९८०मध्ये 'रिश्ते-नाते' या टीव्ही शोमधून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. यानंतर तो 'फेमस ट्रायल्स ऑफ इंडिया' आणि 'एक शून्य शून्य' या मराठी मालिकेत देखील दिसले. या मालिकांमधील शिवाजी साटम यांच्या अभिनयाला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. पण, त्यांना खरी ओळख 'सीआयडी' या टीव्ही शोमधून मिळाली. त्यांची ही मालिका तुफान गाजली होती. 'सीआयडी' ही टीव्हीवरील सर्वाधिक काळ चालणारी मालिका होती. या मालिकेत शिवाजी साटम यांनी ‘एसीपी प्रद्युम्न’ची भूमिका साकारली होती. आजही ते ‘एसीपी प्रद्युम्न’ म्हणूनच अधिक प्रसिद्ध आहेत. 'सीआयडी' मालिकेशी निगडित प्रत्येक अभिनेता आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे.
टीव्ही मालिकांव्यतिरिक्त शिवाजी साटम यांनी चित्रपटांमध्येही आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. १९८८मध्ये 'पेस्टनजी' चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. यानंतर शिवाजी साटम यांनी 'गुलाम-ए-मुस्तफा', 'सूर्यवंश', 'वास्तव', 'पुकार', 'नायक', 'गर्व' आणि 'टॅक्सी नंबर ९२११' यासह अनेक चित्रपटांमध्ये काम केले आणि बॉलिवूड आपले विशेष स्थान निर्माण केले. शिवाजी साटम यांनी हिंदीशिवाय मराठी आणि इंग्रजी चित्रपटांमध्येही काम केले आहे. त्यांच्या दमदार अभिनयासाठी त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले आहेत.
संबंधित बातम्या