Happy Birthday Sharad Kelkar: अभिनेता शरद केळकर हे नाव जरी घेतलं तरी मनात चेहरा तरळण्याआधी पहिला कानांत त्याचा आवाज घुमतो. केवळ दमदार अभिनयच नाही, तर शरद केळकर याने आपल्या आवाजाची जादूही प्रेक्षकांच्या मनावर पसरवली आहे. आज (७ ऑक्टोबर) अभिनेता शरद केळकर आपला ४७वा वाढदिवस साजरा करत आहे. शरद केळकर यांचा जन्म छत्तीसगडमध्ये झाला होता. शरद केळकर अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये अभिनेता म्हणून झळकला असला, तरी आवाजाच्या दुनियेत देखील त्याचा दबदबा आहे. आज जरी शरद केळकर हा अतिशय नावाजलेला अभिनेता असला, तरी इथवर पोहोचण्यासाठी त्याला प्रचंड मेहनत घ्यावी लागली होती.
शरद केळकर याचं बालपण तसं फार कष्टाचं होतं. लहानपणी त्याला एका असा आजार होता. ज्यामुळे त्याला सतत उपेक्षा सहन करावी लागत होती. मात्र, याच आजारावर मात करून तो आज यशस्वी झाला आहे. शरद केळकर याला लहानपणी ‘स्पीच डिसऑर्डर’ अर्थात अडखळत बोलण्याचा आजार होता. सतत अडखळत बोलत असल्यामुळे शाळेत देखील मित्र त्याची टर उडवायचे. प्रत्येक ठिकाणी त्याची टिंगल केली जायची. यातून बाहेर पडण्यासाठी त्याने खूप मेहनत केली. तब्बल २ वर्ष तो या आजारावर मात्र करण्यासाठीचे सगळे प्रयत्न करत होता. अखेर त्याने या आजारावर मात केलीच. केवळ मातच नाही, तर आज शरद केळकर आवाजाच्या दुनियेतलं मोठं नाव आहे.
टीव्ही मालिकांमधून करिअरची सुरुवात करणाऱ्या शरद केळकर याच्यावर एकेकाळ प्रचंड कर्जाचं ओझं होतं. मात्र, त्यानंतर त्याने स्वतःला या स्थितीतून बाहेर काढण्यासाठी खूप कष्ट केले. कधीकाळी त्याने फिटनेस ट्रेनर म्हणूनही काम केले. यातूनच त्याने आपल्या संपूर्ण कुटुंबाला सुखाचे दिवस दाखवले. या प्रवासात त्याच्या आईने आणि बहिणीने त्याला खूप साथ दिली. शरदने मार्केटिंगमध्ये एमबीए पदवी घेतली आहे.
शरद केळकर याने दूरदर्शनच्या ‘आक्रोश’ या मालिकेतून मनोरंजन क्षेत्रात पदार्पण केले होते. यानंतर त्याने ‘भाभी’, ‘रात होने को है’, ‘सीआयडी’, ‘उतरन’ यांसारख्या मालिकांमध्ये शरद केळकर याने काम केले आहे. २००४मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘हलचल’ या चित्रपटात शरदने छोटीशी भूमिका साकारली होती. मात्र, या चित्रपटानंतर त्याला कधीही मागे वळून पाहावे लागले नाही. त्याने ‘तान्हाजी’ या चित्रपटामध्ये साकारलेली ‘छत्रपती शिवाजी महाराजां’ची भूमिका तुफान गाजली होती.