Happy Birthday Rohit Shetty: बॉलिवूड चित्रपटांमध्ये गाड्या उडताना दिसल्या की, लोकांना आपोआप समजते की, या चित्रपटाचा दिग्दर्शक रोहित शेट्टी (Rohit Shetty) आहे. आज (१४ मार्च) रोहित शेट्टी याचा वाढदिवस आहे. दिग्दर्शक-निर्माता रोहित शेट्टी आज त्याचा ५०वा वाढदिवस साजरा करत आहे. ॲक्शनपटांसाठी प्रसिद्ध असलेला रोहित शेट्टी प्रेक्षकांना नेहमीच चित्रपटांच्या माध्यमातून काहीतरी भन्नाट देत असतो. त्याच्या मारधाड आणि भरपूर ॲक्शन असलेल्या चित्रपटांची चाहतेही आतुरतेने वाट पाहत असतात. अभिनेता त्याच्या व्यावसायिक आयुष्यामुळे सर्वाधिक चर्चेत असतो. तर, त्याचे वैयक्तिक आयुष्य मात्र नेहमीच खाजगी ठेवतो. मात्र, एकवेळ अशी होती, जेव्हा रोहित शेट्टीच्या अफेअरच्या चर्चेमुळे वातावरण चांगलंच तापलं होतं.
रोहित शेट्टी आणि अभिनेत्री प्राची देसाई (Prachi Desai) यांच्या अफेअरच्या बातमीची चांगलीच चर्चा रंगली होती. बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये अतिशय चांगली प्रतिमा असलेल्या सेलिब्रिटींमध्ये रोहित शेट्टीची गणना केली जाते. पण एक वेळ अशीही आली होती की, त्याला खूप टीकेला सामोरे जावे लागले. रोहित शेट्टीने २०१२मध्ये 'बोल बच्चन' हा चित्रपट बनवला होता. या चित्रपटात अभिनेता अभिषेक बच्चन, अभिनेता अजय देवगण आणि अभिनेत्री प्राची देसाई मुख्य भूमिकेत दिसले होते. या चित्रपटादरम्यान रोहित शेट्टी आणि प्राची देसाई यांच्यातील जवळीक वाढली. या चित्रपटादरम्यान दोघेही एकत्र राहू लागले होते, असे देखील म्हटले जाते.
रोहित शेट्टी आणि प्राची देसाई जयपूरमध्ये 'बोल बच्चन' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान एकत्र डिनरला जाताना दिसले होते. दोघांचे प्रेमप्रकरण इतके गाजले होते की, रोहित शेट्टीचे लग्न मोडल्याच्या बातम्या येऊ लागल्या. मात्र, रोहित शेट्टी आणि प्राची देसाई यांचे अफेअर फार काळ टिकले नाही. दोघेही लवकरच वेगळे झाले. त्यांच्या अफेअरच्या चर्चांमुळे सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली होती. प्राचीच्या प्रेमात पडण्याआधीच रोहित शेट्टी विवाहित होता. रोहित शेट्टीने २००९ मध्ये माया शेट्टीसोबत लग्न केले होते. या जोडप्याला एक मुलगा असून, त्याचे नाव ईशान आहे.
मनोरंजन विश्वाची पार्श्वभूमी असणाऱ्या रोहित शेट्टीने २००३मध्ये 'जमीन' या चित्रपटाद्वारे दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले होते. रोहित शेट्टीच्या या पहिल्या चित्रपटात अजय देवगण, अभिषेक बच्चन यांच्यासोबत बिपाशा बसू मुख्य भूमिकेत झळकली होती. यानंतर रोहित शेट्टीने अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन केले. यासोबतच तो चित्रपटांची निर्मितीही करतो. तर, छोट्या पडद्यावरील ‘खतरों के खिलाडी’ या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी देखील रोहित शेट्टी उत्तमरित्या सांभाळतो.