Riteish Deshmukh Birthday: केवळ विनोदीच भूमिकेच नव्हे, तर गंभीर भूमिकांमधूनही प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करणारा अशी रितेश देशमुखची ओळख आहे. आज (१७ डिसेंबर) अभिनेता रितेश देशमुख त्याचा ४४वा वाढदिवस साजरा करत आहे. केवळ हिंदीच नव्हे, तर रितेश देशमुख याने मराठी चित्रपटांमध्येही काम केले आहे. ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटापासून सुरू झालेला त्याचा प्रवास आजही अविरत सुरु आहे.
'तुझे मेरी कसम' चित्रपटातून रितेशने त्याच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली होती. या चित्रपटात त्याची पत्नी जिनिलीया डिसूझा हिनेही काम केले होते. मात्र, पहिल्या चित्रपटातून त्याला फारशी लोकप्रियता मिळाली नाही. २००४मध्ये रिलीज झालेल्या 'मस्ती' चित्रपटातून रितेश देशमुख रातोरात प्रसिद्ध झाला. यानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही. रितेश आपल्या अभिनयाच्या जोरावर लाखो हृदयांवर राज्य करतो. अभिनेता असण्याबरोबरच रितेश देशमुख आर्किटेक्टही आहे.
रितेश देशमुखचा जन्म एका राजकीय कुटुंबात झाला. रितेशचे वडील विलासराव देशमुख महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री होते. त्याचबरोबर रितेशचा भाऊही राजकारणात सक्रिय आहे. अभिनेता असण्यासोबतच रितेश आर्किटेक्ट देखील आहे. त्याने मुंबईच्या कमला रहेजा कॉलेज ऑफ आर्किटेक्चरमधून आर्किटेक्चरची पदवी घेतली आहे. इतकेच नाही तर, अभिनेता असण्याबरोबरच रितेश एका आर्किटेक्चरल आणि इंटीरियर डिझायनिंग फर्मचा मालक देखील आहे.
अभिनेता आणि आर्किटेक्ट असण्यासोबतच रितेश देशमुख एक प्रसिद्ध निर्माता देखील आहे. त्याने २०१३ मध्ये ‘मुंबई फिल्म कंपनी’ नावाचे प्रोडक्शन हाऊस सुरू केले. २०१४मध्ये दिवंगत निर्माते निशिकांत कामत निर्मित 'लय भारी' या चित्रपटाद्वारे रितेशने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. या चित्रपटामध्ये राधिका आपटेही मुख्य भूमिकेत झळकली होती. आता लवकरच रितेश आणि जिनिलीया त्यांचा ‘वेड’ हा मराठी चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
संबंधित बातम्या