Happy Birthday Rakesh Roshan: राकेश रोशन केवळ एक चांगले अभिनेताच नाही तर, एक चांगले चित्रपट निर्माते देखील आहेत. आपल्या अभिनय कारकिर्दीत त्यांनी अनेक यशस्वी चित्रपटांमध्ये काम केले. मात्र, एक वेळ अशी आली, जेव्हा त्यांनी अभिनय विश्वाला रामराम म्हणण्याचा निर्णय घेतला. अभिनयाला अलविदा केल्यानंतर, त्यांनी दिग्दर्शन क्षेत्रात आपली ताकद दाखवली. त्यांनी दिग्दर्शन केलेल्या चित्रपटांनी कमाईच्या बाबतीत बॉक्स ऑफिसवर खळबळ उडवून दिली. मात्र, एवढ्या मोठ्या कारकिर्दीत ते कधीच अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करताना दिसले नाहीत. यामागे देखील एक किस्सा आहे. आज (६ सप्टेंबर) राकेश रोशन यांचा वाढदिवस आहे. यानिमित्ताने जाणून घेऊया काही खास गोष्टी....
आपल्या मेहनतीच्या जोरावर राकेश रोशन यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. १९७०मध्ये त्यांनी 'घर-घर की कहानी' या चित्रपटातून अभिनयाच्या जगात प्रवेश केला आणि अनेक चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारल्या. राकेश रोषण त्याकाळातील सुपरहिट हिरो होते. अनेक यशस्वी चित्रपटांतून त्यांनी आपले अभिनय कौशल्य सिद्ध केले होते. मात्र, त्यानंतर त्यांनी अभिनय सोडला आणि यशस्वी दिग्दर्शकांच्या यादीत सामील झाले. त्यांच्या दिग्दर्शनाखाली अनेक अभिनेत्यांसोबत काम केले. पण, ते अमिताभसोबत कधीच दिसले नाहीत.
दिग्दर्शक म्हणून राकेश रोशन यांनी पहिला चित्रपट 'खुदगर्ज' बनवला. यानंतर राकेश रोशनने मागे वळून पाहिले नाही. त्यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेले चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरले. त्यांचा मुलगा म्हणजेच हृतिक रोशन देखील पहिल्याच चित्रपटातून रातोरात सुपरस्टार झाला. राकेश रोशन यांच्या बहुतांश चित्रपटांची नावं फक्त ‘के’ ने सुरू होतात. यामागील कारणही खूप रंजक आहे.१९८२मध्ये त्यांनी 'कामचोर' हा चित्रपट बनवला, हा चित्रपट हिट ठरला. यानंतर त्यांनी १९८४मध्ये 'जाग उठा इंसान' हा चित्रपट आणला, जो बॉक्स ऑफिसवर चांगलाच फ्लॉप झाला. यानंतर १९८६मध्ये जेव्हा 'भगवान दादा' आणला गेला तेव्हा तोही फ्लॉप झाला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, यानंतर त्यांच्या एका चाहत्याने त्यांना चित्रपटांचे नाव ‘के’ अक्षराने सुरू करण्याची कल्पना दिली. यानंतर त्यांनी आपल्या चित्रपटांना ‘के’ अक्षराने नाव देण्यास सुरुवात केली आणि त्यांचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरू लागले.
राकेश रोशन यांनी त्यांच्या करिअरमध्ये अमिताभ बच्चन यांच्यासोबत चित्रपट न करण्यामागे एक रंजक किस्सा आहे. राकेश रोशन यांनीच त्यांच्या एका मुलाखतीत सांगितले होते की, त्यांनी अमिताभ बच्चन यांना डोळ्यासमोर ठेवून ‘किंग अंकल’ हा चित्रपट तयार केला होता. अमिताभ यांनाही चित्रपटाची संकल्पना आवडली. पण, जेव्हा चित्रपट बनवण्याची वेळ आली, तेव्हा वैयक्तिक अडचणींमुळे बिग बींनी चित्रपटात काम करण्यास नकार दिला. त्यानंतर राकेश यांनी जॅकी श्रॉफसोबत चित्रपट पूर्ण केला. यानंतर त्यांनी अमिताभ बच्चन यांच्यासोबत कधीच काम न करण्याचा निर्णय घेतला होता.