Happy Birthday Rahul Roy: बॉलिवूडला लोक मायानगरी आणि स्वप्नांचे शहर असेही म्हणतात. कदाचित बॉलिवूडमध्ये अशा अनेक घटना घडल्या असतील, ज्यामुळे बॉलिवूडला ही विशेषणं देण्यात आली. १९९०मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘आशिकी’ चित्रपटातील राहुल रॉयसोबत देखील असंच काहीसं घडलं. अभिनेता राहुल रॉय याला पहिल्याच चित्रपटातून भरपूर स्टारडम मिळाले, पण ते फार काळ टिकू शकले नाही. बॉलिवूड अभिनेता राहुल रॉय आता ५६ वर्षांचा झाला आहे. राहुल रॉय याचा जन्म ९ फेब्रुवारी १९६८ रोजी कोलकाता येथे झाला. आज राहुल रॉयच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया त्यांच्या आयुष्याशी संबंधित काही न ऐकलेल्या गोष्टी...
चित्रपटसृष्टीत एक चांगली भूमिका मिळण्यासाठी लोकांना अनेक वर्षे वाट पाहावी लागते. मात्र, राहुल रॉयला केवळ २० मिनिटांच्या भेटीत त्याच्या पहिल्याच चित्रपटात मुख्य अभिनेत्याची भूमिका मिळाली. बॉलिवूड चित्रपटांमध्ये एन्ट्री करण्यासाठी त्याला फार धडपड करावी लागली नाही. स्वत: चित्रपट निर्माते महेश भट्ट यांनी त्याला चित्रपटाची ऑफर दिली होती. पहिल्या २० मिनिटांच्या भेटीतच महेश भट्ट यांनी राहुलला चित्रपटात घेणार असल्याचे ठरवून टाकले होते.
एका मुलाखतीत राहुल रॉयने त्याच्या 'आशिकी' चित्रपटानंतर मिळालेल्या यशाबद्दल सांगितले होते. राहुल रॉय म्हणाला की, ‘आशिकी ६ महिने हाऊसफुल्ल चालत राहिला, पण मला त्याचा काही फायदा झालेला दिसत नाही. मला काळजी वाटली आणि मी महेश भट्ट यांच्याकडे गेलो. तेव्हा ते म्हणाले की, लोक आताच तुला बघत आहेत. तू नेमका कसा आहेस हे लोकांना जाणून घ्यायचे आहे. आणि तसेच झाले. ६ महिन्यांनंतर, मला सतत चित्रपटांच्या ऑफर येऊ लागल्या. मी केवळ ११ दिवसांत ४७ चित्रपट साइन केले. मी दिवसातून तीन चित्रपटांचे शूटिंग करायचो. नंतर मला वाटले की, मी खूप चित्रपट साइन केले आहेत. हे एकत्र करणे खूप अवघड होते. यानंतर मी २१ निर्मात्यांचे पैसे परत केले होते.’
यानंतर राहुल रॉय मनोरंजन विश्वातून एकाएकी बाहेर फेकला गेला. बराच काळ गायब झाल्यानंतर २००७मध्ये जेव्हा 'बिग बॉस' हा शो सुरू झाला, तेव्हा सीझन १च्या स्पर्धकांमध्ये राहुल रॉय देखील दिसला. या शोच्या माध्यमातून तो पुन्हा एकदा लोकांच्या पसंतीस उतरला आणि शोचा पहिला विजेता देखील ठरला. पण, या शोच्या यशाचाही त्याच्या बुडत्या कारकिर्दीला काही फायदा झाला नाही आणि राहुल पुन्हा गायब झाला. यानंतर राहुलने काही सी-ग्रेड चित्रपटातही काम केले. ‘सपने साजन के’, ‘पहला नशा’, ‘गुमराह’, ‘भूकंप’, ‘हंस्ते-खेलते’, ‘नसीब’, ‘अच्छा फिर कभी’, ‘नॉटी बॉय’ आणि ‘क्राइम पार्टनर’ अशा चित्रपटांमध्ये तो झळकला होता.