बॉलिवूड अभिनेता आर माधवन आज (१ जून) ५३ वर्षांचा झाला आहे. त्याचा जन्म १ जून १९७० रोजी जमशेदपूर येथे झाला. माधवन अशा तामिळ कुटुंबातून पुढे आला आहे, जिथे शिक्षणाला खूप महत्त्व दिले जात होते. घरात अभ्यासाचं वातावरण असताना देखील माधवनला अभ्यास करावासा वाटत नव्हता. एकदा तर तो आठवीत नापास झाला होता. तर, १०वीची परीक्षा देखील त्याला पुन्हा द्यावी लागली होती. मात्र, नंतर त्याला अभ्यासाची गोडी लागली.
एक काळ असा होता की भौतिकशास्त्र आणि गणितात कमी गुण मिळाल्याने आर माधवनला अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळू शकला नाही. मात्र, खूप मेहनत करून त्याने कोल्हापूरच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळवला. त्याने इलेक्ट्रॉनिक्समध्ये पदवी घेतली आहे. तसेच, त्याने सांस्कृतिक राजदूत म्हणून कॅनडामध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याला महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट कॅडेट पुरस्कारही मिळाला आहे. माधवनने नौदल, लष्कर आणि हवाई दलाचे प्रशिक्षणही घेतले आहे. माधवनला सैन्यात भरती व्हायचे होते. पण, तो त्यावेळी अपेक्षित वयोमर्यादेपेक्षा ६ महिन्यांनी लहान होता. अभिनय कारकीर्द सुरू करण्यापूर्वी त्याने व्यक्तिमत्त्व विकासाचे वर्गही घेतले होते.
आर माधवनने २००१मध्ये दिग्दर्शक गौतम मेनन यांच्या 'रेहना है तेरे दिल में' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. मात्र, याआधी १९९६मध्ये त्याने सुधीर मिश्रा दिग्दर्शित 'इस रात की सुबह नहीं' या चित्रपटात काम केले होते, ज्याचे श्रेय त्याला दिले गेले नाही. यानंतर, २००० मध्ये, त्याने 'अलापयुथे' या चित्रपटाद्वारे साउथ इंडस्ट्रीत प्रवेश केला. त्याचा हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि माधवनची अभिनेता म्हणून कारकीर्द सुरू झाली. आत्तापर्यंत त्याने बॉलिवूडमधील 'रेहना है तेरे दिल में', 'रंग दे बसंती', 'रामजी लंडनवाले', '१३ बी', '३ इडियट्स', 'तनु वेड्स मनू' आणि 'तनु वेड्स मनू रिटर्न्स'' यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. आणि जवळपास प्रत्येक चित्रपटात त्याच्या अभिनयाची प्रशंसा झाली आहे.
माधवनचे वडील रंगनाथन टाटा स्टीलमध्ये मॅनेजमेंट एक्झिक्युटिव्ह होते आणि आई सरोजा बँक ऑफ इंडियामध्ये मॅनेजर होत्या. अभिनेत्याला देविका नावाची एक लहान बहीणही आहे. देविका ही सॉफ्टवेअर इंजिनिअर असून, ती यूकेमध्ये स्थायिक झाली आहे. १९९९मध्ये आर माधवनने एअर होस्टेस सरिता बिर्जेसोबत प्रेमविवाह केला होता. माधवन आणि सरिताला वेदांत माधवन नावाचा मुलगा आहे.
संबंधित बातम्या