Happy Birthday Parineeti Chopra : आज बॉलिवूडची बबली गर्ल आणि बहु-प्रतिभावान अभिनेत्री परिणीती चोप्रा हिचा वाढदिवस साजरा करत आहे. परिणीतीचा जन्म २२ ऑक्टोबर १९८८ रोजी हरियाणातील अंबाला येथे झाला. फार कमी लोकांना माहित असेल की, परिणीती चोप्राला कधीही नायिका बनायचे नव्हते. परंतु, २००९मध्ये आलेल्या आर्थिक मंदीने तिला चित्रपटसृष्टीत येण्यास भाग पाडले. चला तर, परिणीतीच्या वाढदिवसानिमित्त तिच्या कधीच न ऐकलेल्या काही गोष्टी जाणून घेऊया...
परिणीती अभ्यासात खूप हुशार होती. तिने बारावीत टॉप केले होते. यानंतर तिचा राष्ट्रपतींच्या हस्ते गौरवही करण्यात आला. परिणीतीने मँचेस्टर बिझनेस स्कूलमधून फायनान्स, बिझनेस आणि इकॉनॉमिक्सचे शिक्षण घेतले आहे. परिणीती तिच्या एका मुलाखतीत म्हणाली होती की, ‘मी श्रीमंत कुटुंबातील नव्हते, आमच्याकडे कार घेण्याइतके पैसे नव्हते, त्यामुळे मी सायकलने शाळेत जात असे. माझे वडीलही माझ्यासोबत काही अंतरावर सायकल चालवत असत.’
परिणीतीला इन्व्हेस्टमेंट बँकर बनायचे होते. तिने काही काळ बँकेत नोकरीही केली. पण, आर्थिक मंदीमुळे तिची नोकरी गेली. त्यानंतर ती २००९मध्ये भारतात आली आणि इथे तिने यशराज फिल्म बॅनरमध्ये काम केले. परिणीतीकडे अनेक पदव्या होत्या, पण नोकरीची वेळ आली तेव्हा तिला कोणी काम द्यायला तयार नव्हते. एके दिवशी ती तिच्या बहिणीच्या स्टुडिओत काही कामासाठी गेली होती तिथे तिने काही काम मिळेल का?, असे विचारले. काम नाही पण महिन्याला दोन हजार रुपयांत इंटर्नशिप मिळेल, असे उत्तर तिला मिळाले. परिणीतीला ही रक्कम खूपच कमी वाटत होती. पण, त्या दिवसात तिच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे तिने हे काम करण्याचा निर्णय घेतला. या निमित्तानं नवी सुरुवात होईल, असं तिला वाटत होतं.
परिणीतीने मँचेस्टर युनायटेड क्लबमध्ये काम केले होते. जवळपास तीन वर्षे तिने तिथे काम केले, पण तिला फुटबॉलमध्ये रस नव्हता, म्हणून तिने ती नोकरी सोडली. लाखो मुलींप्रमाणेच परिणीतीही बॉलिवूडचा नवाब सैफ अली खानची क्रेझी चाहती आहे. परिणीतीने स्वत: कबूल केले आहे की, ती लेसची पॅकेट गोळा करायची ज्यावर सैफचा फोटो होता. एकेकाळी परिणीतीने राणी मुखर्जीची पीए म्हणूनही काम केले. परिणीती म्हणते की, राणी ही पहिली व्यक्ती होती जिने तिला बॉलिवूडमध्ये नशीब आजमावण्याचा सल्ला दिला होता.
संबंधित बातम्या