Happy Birthday Omi Vaidya: बॉलिवूड अभिनेता आमिर खान याच्या 'थ्री इडियट्स' या चित्रपटाची चर्चा होते तेव्हा, आमिरने साकारलेल्या ‘रँचो’सोबतच आणखी एक व्यक्तिरेखा डोळ्यांसमोर येते ती म्हणजे ‘सायलेन्सर’. अभिनेता ओमी वैद्य याने ही भूमिका साकारली होती. या भूमिकेतून तो सगळ्या प्रेक्षकांचा लाडका ‘चतुर’ बनला. 'थ्री इडियट्स' या चित्रपटाने अभिनेता ओमी वैद्य याला ओळख मिळवून दिली असली तरी, ओमीने आणखी काही बॉलिवूड चित्रपटात काम केले आहे. आज (१० जानेवारी) अभिनेता ओमी वैद्य याचा वाढदिवस आहे. चला तर, या निमित्ताने जाणून घेऊया त्याच्या इतर चित्रपटांबद्दल...
'थ्री इडियट्स' या चित्रपटामध्ये अभिनेता ओमी वैद्य ‘चतुर रामलिंगम’ अर्थात ‘द सायलेन्सर’ या सहाय्यक भूमिकेत झळकला होता. त्याच्या या भूमिकेला प्रेक्षकांकडून जोरदार प्रतिसाद मिळाला. या चित्रपटाच्या पहिल्या ऑडिशनमध्ये उत्तीर्ण झाल्यानंतर, दुसऱ्या ऑडिशनच्या वेळी त्याला ‘लगे रहो मुन्नाभाई’ या चित्रपटामधील डायलॉग म्हणायला सांगण्यात आले होते. यावेळी देखील त्याने थोडासा गोंधळ घातला होता. ‘चतुर’च्या भूमिकेसाठी निवड झाल्यानंतर त्याला वजन वाढवण्यास सांगण्यात आले होते.
‘जोडी ब्रेकर्स’ हा चित्रपट २०१२ला प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अभिनेता आर माधवन आणि अभिनेत्री बिपाशा बसू मुख्य भूमिकेत दिसले होते. ‘जोडी ब्रेकर्स’मध्ये ओमी वैद्य याने ‘नॅनो’ची भूमिका साकारली होती. या चित्रपटातील त्याची भूमिका चांगलीच गाजली होती.
‘दिल तो बच्चा है जी’ हा चित्रपट २०११मध्ये प्रदर्शित झाला होता. मधुर भांडारकर दिग्दर्शित या रोमँटिक-कॉमेडी चित्रपटात अजय देवगण, इमरान हाश्मी आणि शाजन पदमसी, श्रुती हासन, रितुपर्णा सेनगुप्ता यांनी मुख्य भूमिका केल्या आहेत. टिस्का चोप्रा आणि श्रद्धा दास यांच्यासह ओमी वैद्य या चित्रपटात सहाय्यक भूमिकेत झळकले होते.
अब्बास-मस्तान दिग्दर्शित ‘प्लेयर्स’ हा चित्रपट २०१२मध्ये प्रदर्शित झाला होता. हा एक अॅक्शन थ्रिलर चित्रपट होता. या चित्रपटात अभिषेक बच्चन, बॉबी देओल, विनोद खन्ना, सोनम कपूर, बिपाशा बसू, नील नितीन मुकेश, सिकंदर खेर आणि ओमी वैद्य यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
‘देसी बॉईज’ हा डेव्हिड धवनचा मुलगा रोहित धवन दिग्दर्शित कॉमेडी चित्रपट आहे. या चित्रपटात अक्षय कुमार, जॉन अब्राहम, दीपिका पदुकोण आणि चित्रांगदा सिंह मुख्य भूमिकेत दिसले आहेत. या चित्रपटात ओमीला विशेष भूमिका देण्यात आली होती.