अभिनेते अशोक सराफ यांच्याप्रमाणे त्यांच्या पत्नी म्हणजे अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी देखील मनोरंजन विश्व गाजवलं आहे. निवेदिता सराफ यांनी त्यांच्या दमदार अभिनयाने केवळ चित्रपटच नव्हे, तर मालिका देखील खूप गाजवल्या. आज निवेदिता सराफ यांचा वाढदिवस आहे. याच खास निमित्ताने जाणून घेऊया त्यांच्याबद्दलच्या काही खास गोष्टी... निवेदिता सराफ यांनी कलाक्षेत्रात खूप मोठे योगदान दिले आहे. निवेदिता सराफ यांनी गेल्या अनेक वर्षांपासून विविध कार्यक्रम, मालिका आणि चित्रपट यामधून प्रेक्षकांचे खूप मनोरंजन केले आहे. मालिका विश्वातही सध्या त्यांची जोरदार हवा आहे. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्वतःची हक्काची जागा निर्माण केली आहे.
केवळ अशोक सराफ यांची पत्नी म्हणून नव्हे, तर त्यांनी अभिनेत्री निवेदिता सराफ अशी स्वतःची वेगळी ओळख मिळवली आहे. त्यांच्या अभिनय कारकीर्दीची सुरुवात कशी झाली होती?, याबद्दल त्यांनी त्यांच्या एका मुलाखतीत सांगितले होते. या मुलाखतीत बोलताना निवेदिता सराफ म्हणाल्या होत्या की, त्यांना लहान असल्यापासूनच नाटकांचे प्रचंड आकर्षण होते. मात्र, त्यांना चित्रपट पाहायला फारसे आवडायचे नाही. त्यांनी स्वतः देखील पहिल्यांदा नभोनाट्य केले होते. त्यावेळी त्या अवघ्या पाच वर्षांच्या होत्या. निवेदिता सराफ लहान असताना रंगभूमी सोडलं, तर रेडिओ आणि चित्रपट ही दोनच माध्यमे त्यावेळी उपलब्ध होती. त्यातही रेडिओ हे त्यांच्यासाठी अतिशय जवळचे मध्यम होते.
रेडिओच्या माध्यमातून निवेदिता सराफ यांच्या आई या कामगार सभा हा कार्यक्रम करायच्या. त्याचवेळी निवेदिता सराफ यांनी ‘वैरी’ नावाचे नभोनाट्य केले होते. या नभोनाटकात निवेदिता यांनी एका मुलाचे पात्र साकारले होते. आणि या मुलाच्या वडिलांचे पात्र अभिनेते कमलाकर सारंग यांनी साकारले होते. त्यावेळेस निवेदिता सराफ या अवघ्या पाच वर्षांच्या होत्या. त्यांना काही वाचता देखील येत नव्हते. मात्र, या नभोनाट्याचे पाठांतर त्यांच्या आईने त्यांच्याकडून करून घेतले होते.
वयाच्या पाचव्या वर्षी सुरु झालेला त्यांचा अभिनयाचा हा प्रवास आज ६०व्या वर्षांपर्यंत देखील जोरदार सुरू आहे. केवळ अभिनय नाही तर, त्यांच्या सुंदर साड्यांमुळे देखील निवेदिता सराफ या नेहमीच चर्चेत असतात. निवेदिता सराफ यांनी ‘कॉटेज नंबर ५४’, ‘टिळक आणि आगरकर’, ‘तुझ्या माझ्यात’, ‘अखेरचा सवाल’, ‘वाडा चिरेबंदी’, ‘प्रेमाच्या गावा जावे’ यांसारख्या नाटकात दमदार भूमिका केल्या आहेत. तर, त्यांचे चित्रपट देखील भरपूर गाजले आहेत.
संबंधित बातम्या