Happy Birthday Neha Dhupia: नेहा धुपिया इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. ती तिच्या व्यावसायिक आयुष्यापेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्यासाठी जास्त चर्चेत असते. नेहा धुपियाचा आज (२७ ऑगस्ट) वाढदिवस आहे. आज तिच्या वाढदिवसानिमित्ताने जाणून घेऊया तिचा मिस इंडिया बनण्यापासून ते इंडस्ट्रीत येण्यापर्यंतचा प्रवास...
नेहा धुपियाचा जन्म २७ ऑगस्ट १९८० रोजी केरळमधील लष्करी कुटुंबात झाला. अभिनेत्रीचे वडील प्रदीप सिंह धुपिया भारतीय नौदलात अधिकारी होते आणि तिची आई मणिपिंदर धुपिया या गृहिणी आहेत. नेहाने दिल्लीच्या नेव्हल पब्लिक स्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केले. यानंतर तिने दिल्ली विद्यापीठातील जिझस अँड मेरी कॉलेजमधून इतिहास विषयात पदवीचे शिक्षण पूर्ण केले.
नेहा धुपिया ही लष्करी कुटुंबातील असल्याने सुरुवातीपासूनच शिस्तप्रिय आणि आत्मविश्वासी होती. कॉलेजमध्ये असताना तिने मॉडेलिंगला सुरुवात केली होती. आपल्या क्षमतेच्या जोरावर ती कोणत्याही आव्हानावर मात करू शकते, हे नेहाला माहीत होते. याच कारणामुळे तिने मिस इंडिया स्पर्धेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला आणि त्यासाठी तिने खूप मेहनतही घेतली. फिटनेसपासून ते व्यक्तिमत्त्वापर्यंत प्रत्येक गोष्टीवर तिने बारकाईने काम केले. नेहा धुपियाने तिच्या मेहनती आणि प्रतिभेच्या जोरावर शेवटी २००२ची 'फेमिना मिस इंडिया' स्पर्धा जिंकली आणि त्यासोबत तिने मिस युनिव्हर्स २००२ स्पर्धेतही भारताचे प्रतिनिधित्व केले. या स्पर्धेत तिने ‘टॉप १०’मध्ये आपले स्थान निर्माण केले होते.
नेहा धुपियाने २००३ साली 'कयामत: सिटी अंडर थ्रेट' या चित्रपटातून मॉडेलिंग केल्यानंतर फिल्मी दुनियेत प्रवेश केला. पण, तिच्या डेब्यू चित्रपटापेक्षाही या अभिनेत्रीला खरी ओळख २००४मध्ये आलेल्या 'जुली' चित्रपटातून मिळाली. या चित्रपटात अभिनेत्रीने खूप बोल्ड व्यक्तिरेखा साकारली होती, ज्यानंतर तिने खूप चर्चेत आली. या अभिनेत्रीला इंडस्ट्रीत ते स्थान मिळाले नाही, ज्यासाठी ती खरोखरच पात्र होती. पण, नेहा ही इंडस्ट्रीतील प्रतिभावान अभिनेत्रींपैकी एक आहे, यात शंका नाही.
आता नेहाने ओटीटीच्या जगात प्रवेश केला आहे. टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय रिॲलिटी शो 'रोडीज'मध्ये ती जज म्हणूनही दिसली आहे. या शोमधील तिची स्पष्टवक्ता शैली लोकांना फार आवडली. नेहा धुपियाच्या 'नो फिल्टर नेहा' या चॅट शोचीही खूप चर्चा आहे. नेहा अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींना आपल्या शोमध्ये आमंत्रित करते आणि त्यांच्या वैयक्तिक-व्यावसायिक जीवनाबद्दल बोलतं करते.