Happy Birthday Mrunmayee Deshpande : मालिका, चित्रपट, नाटक असो वा वेब सीरिज अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिने नेहमीच प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले आहे. मृण्मयी देशपांडे हिने छोट्या पडद्यावरून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं. 'कुंकू' या मालिकेतून ‘जानकी’ बनून तिने अवघ्या महाराष्ट्रातील प्रेक्षकांची मनं जिंकली होती. महाराष्ट्रातील घराघरात आणि प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलेल्या मृण्मयी देशपांडेने 'अग्निहोत्र' या मालिकेत देखील काम केले होते. तर, काही चित्रपटांमधील तिच्या भूमिका प्रेक्षकांना कायम लक्षात राहिल्या. जाणून घेऊया अशाच काही भूमिकांबद्दल...
‘कट्यार काळजात घुसली’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. या चित्रपटात मृण्मयीने साकारलेली भूमिका चांगलीच गाजली होती. तिचा हा चित्रपट एक म्युझिकल ड्रामा चित्रपट होता. अभिनेते सचिन पिळगावकर, शंकर महादेवन आणि सुबोध भावे यांनी या चित्रपटात मुख्य भूमिका साकारल्या होत्या. या चित्रपटात पंडित भानू शंकर शास्त्री यांच्या मुलीचे म्हणजेच उमा शास्त्रीचे पात्र मृण्मयीने साकारले आहे.
‘नटसम्राट’ या अजरामर कलाकृतीवर आधारित याच नावाचा २०१६मध्ये प्रदर्शित झाला होता. अभिनेते नाना पाटेकर यांची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट गणपत रामचंद्र बेलवलकर या नाट्यसृष्टीतील महत्त्वाच्या नटाच्या आयुष्यावर आधारित आहे. नटसम्राट गणपत बेलवलकर यांच्या मुलीचे म्हणजेच विद्याचे बेलवलकर हे पात्र मृण्मयीने साकारले आहे.
‘फर्जंद’ या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातील एक सुवर्ण पान उलगडण्यात आले होते. या चित्रपटात आरमारातील सेनानी, मावळा कोंडाजी फर्जंद यांनी पन्हाळा कसा काबीज केला याचे चित्रण करण्यात आले आहे. या चित्रपटात ‘केसर’ ही भूमिका मृण्मयीने साकारली आहे. केसरच्या अचूक माहितीमुळे आणि मदतीमुळे पन्हाळा काबीज करणे आणखी सोपे झाले होते.
स्त्रीभ्रूण हत्या या विषयावर आधारित ‘मोकळा श्वास’ या चित्रपटात अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिने मुख्य भूमिका साकारली होती. तिचा हा चित्रपट अनुराधा वैद्य यांच्या 'चौफुला' या कादंबरीवर आधारित होता. यात अशा एका बापाची कथा दाखवण्यात आली आहे, जो मुलगा हवा या हव्यासापोटी त्याच्या तिन्ही मुलींचा द्वेष करतो. यातील मोठ्या मुलीचे पात्र मृण्मयी देशपांडे हिने निभावले आहे.
संबंधित बातम्या