मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  मृण्मयी देशपांडे हिला कशी मिळाली होती अभिनय विश्वात एन्ट्री? वाचा अभिनेत्रीच्या आयुष्याचा भन्नाट किस्सा!

मृण्मयी देशपांडे हिला कशी मिळाली होती अभिनय विश्वात एन्ट्री? वाचा अभिनेत्रीच्या आयुष्याचा भन्नाट किस्सा!

May 29, 2024 08:27 AM IST

‘कुंकू’ या मालिकेतून अवघ्या मराठी प्रेक्षकांच्या मनात हक्काची जागा मिळवणाऱ्या मृण्मयीने ‘अग्निहोत्र’ या मालिकेत देखील काम केले होते.

मृण्मयी देशपांडे हिला कशी मिळाली होती अभिनय विश्वात एन्ट्री?
मृण्मयी देशपांडे हिला कशी मिळाली होती अभिनय विश्वात एन्ट्री?

छोटा पडदाच नव्हे, तर चित्रपट, नाटक आणि मालिका विश्व गाजावणारी अभिनेत्री म्हणून मृण्मयी देशपांडे हिचं नाव आवर्जून घेतलं जातं. ‘कुंकू’ या मालिकेतून प्रेक्षकांचं मन जिंकून घेणाऱ्या मृण्मयी देशपांडे हिचा आज वाढदिवस आहे. ‘कुंकू’ या मालिकेतील प्रमुख भूमिका साकारणारी जानकी आजही सगळ्यांच्या लक्षात आहे. या मालिकेनंतर तिचं खरं विसरून लोक तिला जानकी म्हणूनच ओळखू लागले होते. मृण्मयी देशपांडे हिने एका हिंदी चित्रपटातून मनोरंजन विश्वात पदार्पण केलं होतं. ‘कुंकू’ या मालिकेतून अवघ्या मराठी प्रेक्षकांच्या मनात हक्काची जागा मिळवणाऱ्या मृण्मयीने ‘अग्निहोत्र’ या मालिकेत देखील काम केले होते.

ट्रेंडिंग न्यूज

मृण्मयी देशपांडे ही मुळची पुण्याची आहे. तिचा जन्म २९ मे १९८८ रोजी पुण्याच्या सदाशिव पेठेत झाला. तिथेच ती लहानाची मोठी झाली. ‘रेणुका स्वरूप मेमोरियल गर्ल्स हायस्कूल’मधून तिने शालेय शिक्षण पूर्ण केलं. तर, पुढे एसपी कॉलेजमधून तिनं महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलं. अवघ्या सातवी इयत्तेत असताना मृण्मयी अभिनय करू लागली होती. तिला स्वतःला कथकची देखील प्रचंड आवड होती. त्यामुळे तिने मनीषाताई साठे यांच्याकडून कथकचे धडे घेतले. मृण्मयी देशपांडे ही कथक विशारद देखील आहे. कथक, लावणी, शास्त्रीय संगीत, सातर ते वीणावादन या सगळ्याचीच आवड असल्याने, अभिनयात तिला या सगळ्याचा चांगला उपयोग झाला. कॉलेजमध्ये असताना देखील तिने अनेक नाटकांमध्ये विविध भूमिका केल्या. इतकंच नाही, तर तिने नाटकांचे दिग्दर्शनही केले.

आमिर खानच्या ‘दंगल’ फेम अभिनेत्रीवर कोसळला दुःखाचा डोंगर; अतिशय जवळच्या व्यक्तीचे निधन

कशी मिळाली पहिली संधी?

कॉलेजमध्ये असताना तिने काही नाटक स्पर्धांमध्ये देखील भाग घेतला होता. त्यावेळी तिची एक मैत्रीण एका शॉर्ट फिल्ममध्ये काम करत होती. या शॉर्ट फिल्मच्या असिस्टंट डिरेक्टरने मृण्मयीला पाहिलं. यानंतर त्याने तिला एका ऑडिशनसाठी यायला सांगितलं. त्यावेळी मृण्मयीने ऑडिशन दिली होती. यानंतर पुन्हा दोन महिन्यांनी तिला ऑडिशनसाठी बोलावलं गेलं आणि तिची निवड एका बॉलिवूड चित्रपटासाठी झाली. हे ऐकल्यानंतर मृण्मयीचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.

मालिका विश्वात एन्ट्री केली अन्…

२००८च्या ‘हमने जीना सीख लिया’ या चित्रपटात तिने सिद्धार्थ चांदेकरसोबत स्क्रीन शेअर केली होती. ‘शाळा’ या मराठी कादंबरीवर आधारित हा चित्रपट होता. या चित्रपटामुळे मृण्मयीला फारशी लोकप्रियता मिळाली नाही. परंतु, तिच्यासाठी मनोरंजन विश्वाची दारं उघडी झाली. मृण्मयी एवढ्यावरच थांबली नाही, तर तिने छोट्या पडद्यावर यायचं ठरवलं. त्यानंतर तिने अनेक मालिकांसाठी ऑडिशन द्यायला सुरुवात केली. यादरम्यान तिला ‘अग्निहोत्र’मध्ये छोटीशी भूमिका साकारण्याची संधी मिळाली. ही तिची पहिली मालिका होती. त्यानंतर ‘कुंकू’ या मालिकेत तिला जानकी ही मुख्य भूमिका साकारण्याची संधी मिळाली आणि या भूमिकेतून तिने संधीच सोनं करत प्रेक्षकांच्या मनात हक्काची जागा निर्माण केली.

टी-२० वर्ल्डकप २०२४