Happy Birthday Mrunal Thakur: मनोरंजन विश्वात असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी छोट्या पडद्यापासून सुरुवात करून, बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. शाहरुख खानपासून ते विद्या बालनपर्यंत हे सेलिब्रिटी एकेकाळी छोट्या पडद्यावर दिसले होते. पण आज त्यांची नावे चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध आणि लोकप्रिय कलाकारांच्या यादीत घेतली जातात. या यादीत टीव्हीच्या 'बुलबुल'चे नावही सामील झाले आहे. ‘कुंडली भाग्य’ या टीव्ही शोमध्ये ‘बुलबुल अरोरा’ ही व्यक्तिरेखा साकारून आपला ठसा उमटवणारी अभिनेत्री मृणाल ठाकूर आता बॉलिवूड गाजवत आहे. अभिनेत्री मृणाल ठाकूर आज (१ ऑगस्ट) तिचा ३२वा वाढदिवस साजरा करत आहे. एकेकाळी छोट्या पडद्यापासून सुरुवात केलेल्या मृणालने आज केवळ बॉलिवूडमध्येच नाही, तर टॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीतही आपले नाव कमावले आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, मृणाल ठाकूर हिला तिच्या कारकिर्दीत अनेकदा नकारांचा सामना करावा लागला होता. तिला बॉडी शेमिंगचाही सामना करावा लागला होता. याचा खुलासा खुद्द मृणालने एका मुलाखतीत केला होता. एक वेळ अशी आली होती की, ती आत्महत्येचा विचार करू लागली होती.
मृणाल ठाकूर ही मूळची महाराष्ट्रातील नागपूर येथील आहेत. मुंबईच्या किशनचंद चेलाराम कॉलेजमधून तिने आपले शिक्षण पूर्ण केले आहे. एक काळ असा होता जेव्हा मृणालने पत्रकार होण्याचे स्वप्न पाहिले होते. पण, नशिबाने काहीतरी वेगळेच ठेवले होते. मृणाल ओघओघाने अभिनयाच्या दुनियेत आली. मात्र, इथला प्रवास तिच्यासाठी सोपा नव्हता. २०१२मध्ये मृणाल ठाकूरने 'मुझसे कुछ कहती है... ये खामोशियां' या शोमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. यानंतर तिने ‘कुंडली भाग्य’, ‘युगांतर’ आणि ‘अर्जुन’ असे अनेक शो केले. पण, त्यातून तिला फारशी ओळख मिळाली नाही.
मृणाल ठाकूरला बॉलिवूडमध्ये नशीब आजमावायचे होते. यासाठी तिला खूप संघर्ष करावा लागला. अनेकदा नकारांना सामोरे जावे लागले. या दरम्यान ती इतकी खचली की, तिच्या मनात आत्महत्येचे विचार येऊ लागले. २०१८ मध्ये मृणालला 'लव्ह सोनिया' चित्रपटातून पहिला ब्रेक मिळाला. या चित्रपटातील तिचे काम खूप पसंत केले गेले होते. २०१९ मध्ये, ऋतिक रोशनच्या 'सुपर ३०' चित्रपटाने तिचे नशीब उजळले आणि या मुख्य भूमिकेतील चित्रपटाने मृणालला रातोरात स्टार बनवले. यानंतर तिला एकापाठोपाठ अनेक चित्रपटांच्या ऑफर्स येऊ लागल्या. आजघडीला मृणालने केवळ बॉलिवूडच नाही, तर टॉलिवूडमध्येही आपला ठसा उमटवला आहे.
संबंधित बातम्या