
Happy Birthday Mithun Chakraborty : बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांचा आज (१६ जून) ७३वा वाढदिवस आहे. मिथुन दा हे ९० च्या दशकातील नंबर वन स्टार राहिले आहेत. त्यांनी बॉलिवूडला अनेक उत्तम चित्रपट दिले आहेत. मिथुन चक्रवर्ती यांनी १९७६मध्ये ‘मृगया’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. मात्र, ‘डिस्को डान्सर’ या चित्रपटातून त्यांना लोकप्रियता मिळाली. या चित्रपटातील 'आय एम अ डिस्को डान्सर' हे गाणे आजही लोकांच्या ओठावर आहे. १०० कोटींहून अधिक कमाई करणारा हा भारतातील पहिला चित्रपट होता.
मिथुनदा यांचा जन्म एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला, पण त्यांच्या मेहनतीमुळे आणि कर्तृत्वामुळे आज ते कोट्यवधींचे मालक आहेत. मात्र, मनोरंजन विश्वात येऊन कोट्यवधी कमावणारे मिथुन चक्रवर्ती कधीकाळी नक्षलवादी होते. मिथुनदा यांचा जन्म १६ जून १९५० रोजी कोलकाता येथे झाला. बीएससीचे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट पुणे येथून पदवी प्राप्त केली. यानंतर ते नक्षलवाद्यांच्या गटात सामील झाले आणि स्वतः देखील नक्षलवादी बनले होते.
पण, एका अपघातात भाऊ गमावल्याने ते पूर्णपणे खचून गेले. एका नक्षल चळवळीदरम्यान त्यांच्या भावाचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला होता. या घटनेने ते पूर्णपणे तुटून गेले होते आणि त्यावेळी त्यांना त्यांच्या कुटुंबाची काळजी वाटत होती. अशा परिस्थितीत त्यांनी चित्रपटसृष्टीत हात आजमावण्याचा विचार केला. इथेही मिथुन यांच्यासाठी मार्ग सोपा नव्हता. इंडस्ट्रीत काम मिळवण्याआधी त्यांना फूटपाथवर रात्र काढावी लागली होती.
चित्रपटात पदार्पण केल्यानंतर ८०चे दशक त्यांनी चांगलेच गाजवले होते. पण, एक वेळ अशीही आली जेव्हा मिथुनदा यांचे चित्रपट सतत फ्लॉप होऊ लागले. १९९३ ते १९९८पर्यंत त्यांचे सलग ३३ चित्रपट फ्लॉप झाले. पण, सतत फ्लॉप चित्रपट देऊनही त्याचा मिथुन चक्रवर्ती यांच्या स्टारडमवर काहीही परिणाम झाला नाही. या काळातही मिथुन यांनी सलग १२ चित्रपट साईन केले होते. 'जाग उठा इंसान' चित्रपटाच्या सेटवर मिथुन दा यांची योगिता बालीशी भेट झाली. त्यानंतर त्यांच्यात प्रेम फुलू लागलं आणि त्यांनी एकमेकांशी लग्न केलं.
संबंधित बातम्या
